किल्ल्या

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,


बाहेरुन घरात आल्यावर लॉक लावुन मी किल्ल्या भिरकावून लावते. मग परत बाहेर जायच्या वेळी मला तयार व्हायला ५ मिनिट आणि घराच्या किल्ल्या शोधायला १० मिनिट लागतात. या धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात आपण आठवणींच्या बाबतीतसुध्दा असच करतो. मनात निरनिराळे कप्पे करतो त्यात निरनिराळे अनुभव, अनुभुती, भावना, आठवणी नकळत भरत राहतो.

आपल्या यांत्रिक जीवनात मग आपण ह्या कप्प्यांना घट्ट कुलुप घालुन धुळ खात पडु देतो. निवांत विचार करत बसलो आहोत आणि त्यातुनच मनाचा एक एक कप्पा उघडत जातो आहे आणि आठवणी ताज्या होत आहेत अस फार कमी वेळेला होत. आयुष्य अगदीच यांत्रिक राहु नये म्हणुन आपल्या नकळतच आपल्या मनाने त्याच्या कप्प्यांच्या किल्ल्या कुठेकुठे पेरुन ठेवल्या असतात ज्या हलकेच आपल्याला भुतकाळात घेउन जातात. त्याची अनुभुती तुम्हालाही झाली असेल.

कुठुनशी अलगद हवेची झुळुक येते आणि एका कप्प्याला उघडुन जाते. मग मन उडुन जात, पुर्वीसुध्दा अश्याच आलेल्या हवेच्या झुळुकेभोवती उडु लागत. मनाने त्याच्या काही किल्ल्या वासांमधे लपवल्या असतात. मग पावसानंतर येणारा मातीचा सुगंध कुठेतरी दुर, तुमच्या गावातल्या रानात तुम्हालाही घेऊन जात असेल. स्पर्शामधेसुध्दा एक किल्ली लपलेली असते. आईच्या जुन्या साडीच्या चौघडीचा स्पर्श झाला की ती पुन्हा तिच्या कुशीत नेऊन सोडते.

काही वेळा अशी एखाद किल्ली आवाजांमधे असते. जस समुद्राचा खळखळणारा नुसता आवाज ऐकला की आपण कोकणातल्या, गोव्यातल्या (किंवा तुम्ही कदाचीत हवाईच्या) समुद्रकिनारयावर जाऊन पडता आणि त्या खारया पाण्यात मनसोक्त डुंबु लागता. कधी कुठुनस गाण ऐकु येत आणि आपण कॉलेजच्या सहलीबरोबर काळोख्या रात्री लावलेल्या शेकोटीभवती तेच गाण म्हणत नाचतांना सापडतो.

कधी कधी किल्ली नावांत असते, मग त्यातल एखाद नाव ऐकल; वाचल की ती भराभर कुलुप उघडुन आठवणींना बाहेर काढते. सुखाच्या, दुःखाच्या, अवहेलना, अपमानाच्या तर कधी मैत्रीच्या. कधीकधी कुठल्यातरी नावाकडे ’मास्टर की’ असते. मग ते नाव ह्या सर्वच आठवणींना उचंबळुन बाहेर खेचत.

आणि अशातच पुन्हा अस्तित्त्वाची जाणीव होते आणि आपण सैरावैरा पळणारया मनाला पकडतो, विखुरलेल्या आठवणींना गोळा करतो. परत त्यांना कप्प्यांमधे भरुन किल्ल्या भिरकावून लावतो!

2 comments:

Dhananjay said...

Good write-up!

Jay said...

wow..

marathi sahich aahe ki tuza.... !!!