पर्सनल स्टाईल ब्लॉग

Author: Rasika Mahabal /

सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी अस बऱ्याच वेळा केल आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे.

पर्सनल स्टाईल ब्लॉग काय असतो?

लोक त्यांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या वस्तू कुठून घेतल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात. स्टाईल ब्लॉग्स कपडे लत्ते वगैरे अश्या अमूर्त म्हणवल्या जाणाऱ्या मूर्त गोष्टींबद्दल असतात.

आपण काय घालतो ह्याने कोणालाही फरक पडत नाही, मग त्याकरता वेळ का घालवा?

ड्रेस, शूज, नविन हेअरकट, दागिने ह्या तर फार क्षुल्लक गोष्टी आहेत, खरे बघता त्याने आयुष्यात काहीच फरक पडायला नको कारण लोक म्हणतात आपल्या बाह्य स्वरूपास नव्हे तर आपल्या आतील सौदर्याचे जास्त महत्त्व असते. पण आपली वेषभूषासुध्दा आपली एकाप्रकारे ओळख देत नसते का?

प्रामाणिकपणे सांगायच झाल तर प्रत्येक मुलीला कपडे, शूज ह्यात नेहमीच रस असतो!

मी स्टाईल मासिक का वाचायला लागले?

उपरोधिक वाटेल पण कुठल्याही दिवशी कपड्यांवर विचार वा वेळ दवडण्याची मला काडीमात्र ईच्छा नसते. पोषाखी नसलं तरी निटनिटके व टापटिप रहायला मात्र मला नक्कीच आवडते. असे अनेक वेळा घडले आहे की मी आणलेले कपडे तसेच पडून राहिलेत कारण कधी ते माझ्याकडील असलेल्या कुठल्याच वस्तूवर चांगले दिसले नाहीत किंवा बऱ्याचदा ते कशावर चांगले दिसतील हे मला कळाले नाही. तेव्हा मला वाटले की किती बरे होईल जर मला कोणि कशावर काय चांगले दिसत, ते कुठून आणायच, किती निरनिराळ्या प्रकारे वापरायच अश्या युक्त्या रोज दिल्यात. म्हणून मग मी स्टाईलची मासिक व ब्लॉग्स बघायला सुरुवात केली.

मी पर्सनल स्टाईल ब्लॉग का सुरु केला?

निर्मितीमधून मला जास्त आनंद मिळत असल्याने मी काय उपभोगल त्यावर एक ब्लॉग सुरु केला! मला वाटल माझ्यासारखे अजून बरेच जण 'काय घ्याव, काय घालाव' अश्या गोंधळातून गेले असतील.

मी तो डेव्हिल नाही जी प्राडा घालते, लुई व्ह्टोन बाळगून मी विधानं करत नाही, मी स्टाईलिस्ट नाही किंवा माझ्या ब्लॉगकरता मला पैसेही मिळत नाही, मग माझा स्टाईल ब्लॉग तुम्ही का बघावा? कारण मग मी तुमच्यासारखीच आहे म्हणून…

माझ्या स्टाईल ब्लॉग मधे वेगळ काय आहे?

माझी स्टाईल खूप साधी आहे, मला खूप दागिने, वेशभूषा किंवा मेकअप आवडत नाही. रोज दोन मिनिटात निट्निटक तयार होता येईल अश्या आइडियाज मी ब्लॉगवर शेअर करते. माझ्या ब्लॉग मधून मला लोकांना नविन वस्तू घेण्यास मला प्रवृत्त करायचे नसून एकाच गोष्टीचा किती विविध प्रकारे वापर करता येतो व क्लॉझेट मधे कुठल्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा ते दाखवायचं आहे.

काय चांगल दिसत हे पूर्णपणे माझ मत आहे आणि अर्थातच ती काही आदर्श वगैरे पध्दत नाहीये. पण तरीदेखील तुम्हाला त्यामधील काहीतरी आवडू शकेल व तुमच्या स्टाईलच्या व्याख्येप्रमाणे तुम्ही त्याला वापरू शकाल. स्टाईलिंग ही एक आब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे आणि कला नेहमीच व्यक्तिनिष्ठ असते. मला स्टाइलिंग खूपस पेंटिंग सारख वाटत जिथे मला रंग व पॅटर्नसोबत खेळता येत.

क्लोझेटमधे अगदी थोड्या साहित्यातून निर्माण होणाऱ्या अनेक शक्यता मला ब्लॉगमधून दाखवायच्या आहेत.

ही माझ्या ब्लॉगची लिंक आहे  - http://lifestyleandallthatjazz.blogspot.com. तुम्हाला आवडल्यास तुमचे मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुमचा अभिप्राय जाणायला मला निश्चितच आवडेल!

मिलिंद बोकील

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

शाळा - शाळेत गेलेल्या सगळ्यांना आवडेल अस हे पुस्तक मी वाचल आणि मिलिंद बोकिलच्या प्रेमात पडले, त्यांची सगळी पुस्तक वाचण्याच मी ठरवल. ह्या पुस्तकावर निघालेला चित्रपट मला अजिबात आवडला नव्हता. जमल्यास पुस्तक जरूर वाचा.

एकम - काही पुस्तक तुम्हाला मंत्रमुग्ध करतात त्यापैकी एकम एक मला वाटल. खूप डीप मिनिंगची एका लेखिकेच्या आयुष्यावर आधारित ही एक कथा आहे. सुंदर अर्थाच सुंदर पुस्तक.

उदकाचिया आर्ती  - ह्या पुस्तकातील लघू कथा मला आवडल्यात.

मैत्री

Author: Rasika Mahabal /


जी लोक तुम्हाला सर्वात जास्त सलोख्याची वाटतात, ज्यांच्यासोबत तुम्हाला भावनिक गुंतवणूक आहे, ज्यांची गरज भासल्यास अगदी मध्यरात्रीही त्यांना संपर्क करण्यास तुम्हाला प्रशस्त वाटेल अश्या व्यक्तिंची यादी एका पेपरवर लिहा. ह्या एक्सरसाइझ करता सध्या कुटुंबातिल लोकांची नावे व्यर्ज करुयात. लिहिलित? किती नावे झालित?  माझ्या यादीत 10 हुन कमी नाव आहेत.

मधे 'पॉवर ऑफ हेबिट' नावाच्या पुस्तकात वाचण्यात आल की आपल्या मेंदुस एका वेळेस 12 अगदी घनिष्ठ नाती सांभाळता येतात.

आपला ताणतणाव व धकाधकीच आयुष्य लक्षात घेता किती लोकांना तुम्हाला चांगल्या प्रतिचा वेळ देता येतो? तुम्ही तुमचा वेळ व शक्ति यादीमधील लोकांवर खर्च करावी का विविधतेने आयुष्यात जास्त रंग भरतो?

एका घनिष्ठ मैत्रीमधे तुम्ही काय बघता? ज्या व्यक्तीला तुम्ही घनिष्ठ समजता ती तुम्हाला गावातील नुसता एक मित्र म्हणून बघते की त्यांनाही तुम्ही जवळचे वाटता ?

एका घनिष्ठ मैत्रीकरता कशाकशाची गरज असते?

दुसऱ्या व्यक्तिच्या आयुष्यात अगदी मनापासून रस वाटणे - त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करण्याची गरज भासते.

दुसऱ्याच्या निर्णयांना स्विकारणे.

तुलना - मला तुझ्यापेक्षा जास्त चांगल किंवा वाईट आयुष्य, कुटूंब अथवा घर आहे. मैत्रिला तुलना कमजोर बनवते.

आदर - 'मी कष्ट करुन आज इथे पोचलो आहे, तू फक्त नशीबवान होतास' - जसा आयुष्यातील कुठल्याही नात्यात आदर महत्वाचा असतो तसाच मैत्रिमधे पण असतो. खाजगीत किंवा लोकांसमोर मित्राचा अपमान करणे मैत्रिस घातक आहे.

एक व्यक्ति म्हणून वाढ होणे - कुठलही नात तेव्हाच सफल होत जेव्हा त्यातील दोन्ही व्यक्तिंची निरनिराळ्या पातळ्यांवर वाढ होते जस की शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक… आधार न देता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सतत कुबडी बनवलत तर  मैत्री टिकावू रहात नाही.

परतफेड - वरील सगळ्या गोस्टी जुळल्या असतील तर 'परतफेड' होते.  म्हणजे एकच व्यक्ती जर संपर्क ठेवण्यास प्रयत्नशील असेल, त्यांच्या आयुष्यातील घटनांमधे, उत्सवांमधे तुम्हाला सहभागी करायला बघत असेल आणि तुमच्याकडून त्याचा प्रतिसाद व परतफेड नसेल तर मैत्री टिकणे अवघड ठरते, दोन्ही बाजूंनी तेवढाच उत्साह असणे गरजेचे आहे.

आणि मुख्यत्वे दोघांकरता मैत्रीचा हां अनुभव सुखद असणे गरजेचे असते.

आपण बनवलेल्या यादीकडे परत येऊया. ही यादी कायम असते की काळ  व वेळेनुसार बदलत राहते? आणि बदलते तर ते प्रेम, आदर, स्वारस्य व तुमच्या त्या व्यक्तीसोबतचया भावनिक बांधिलाकिचे काय होते?

बरयाच गोष्टी मैत्रीला बदलतांना मी बघितल्या - छंद, सवयी, खाण्यापिण्याच्या आवडी, स्टेटस बदल - लग्नाळू/ लग्न झालेले/ मूल बाळ असलेले, नोकरी करणारे न नोकरी करणारे, भौगोलिक अंतर ह्या त्यापैकी काही आहेत. बरयाच वेळा वरील मुद्द्यांना जास्त चांगल्या प्रकारे match होणारे नविन मित्रमंडळी भेटल्यास तुम्ही आपसूकच त्यांच्या वर्तुळातून बाहेर पडता. अजून एक म्हणजे वयासोबत चर्चेचे विषय पण बदलतात, रात्री जास्त झालेल्या दारुपेक्षा आयुष्यावर बोलू काही चर्चासत्र बरे वाटते.

तुमचे तुमच्या लिस्ट मधील लोकांच्यामधे दुरावे आल्यास दुःख एखाद्या प्रेमभंगाएवढ असू शकत. तुम्ही ते कस हाताळता? काहीच घडल नाही अस? का काही महीने लागतात संबंध विसरायला?

संबंध बिघडलेत तर त्या व्यक्तिवरच प्रेम कुठे जात? मला वाटत तुमच्या मनातल्या एका कोपरयात ते जसच्या तस राहत आणि लोक पुढे जातात.

हां पोस्ट त्या लोकांना अर्पित जे माझ्या लिस्ट वर आहेत व होते. तुम्ही किंवा मी जाणूनबुजून अथवा अजाणता दुरावा केला असेल, माझी खजिली व्यक्त करते, पण तुम्हा सगळ्यांना एवढच सांगायच होत की माझ्या आठवणींना आज तुम्ही सुंदर बनवता. तुमच्या मैत्रीची मी आभारी आहे!

तो

Author: Rasika Mahabal /



रात्री अंथरुणावर पडेपर्यंत सोबत होता, वाचत राहिले तितका वेळ आजूबाजूला घुटमळला.

झोपले तेव्हा दिवसभरात कमावलेल सगळ काही घेऊन गेला. आज मी कफल्लक.
समोर नविन दिवस उभा पण ह्या अफाट विश्वात त्याला कुठे शोधू जो काल मावळला?

शापित

Author: Rasika Mahabal / Labels:


मधे ल. त्र्यं. जोश्यांनी लिहिलेला पेपरमधील त्याच्याबद्द्लचा लेख वाचला व त्याची आठवण झाली. त्याची फार सुंदर छबी जोश्यांनी मांडली, अगदी तसाच होता तो!

एकदम उगवायचा, मी रहायालाच आलो आहे सांगायचा. आल्या आल्या भूक लागली जाहीर करुन शिळ्या पोळीत खुष असायचा.

येतांना माझ्याकरता स्वत:ने रंगवलेल चित्र, काड्यांनी बनवलेली हातगाडी अस काही हमखास आणायचा. बाजूला बसवुन मला रंगकाम, crafts शिकवायचा. आता रिकामे डब्बे, कागद, काड्या ह्यांच्या वस्तू बनवल्या, कुठलही चित्र काढल की त्याच स्मरण होत. त्याने दिलेली भेट आयुष्याला विलोभनीय बनवणारे छंद देउन गेली.

शिक्षणाने व व्यवसायाने फ्रीलांस पत्रकार व उत्तम कार्टूनिस्ट अगदी लक्ष्मणच्या पातळीवरचा. बोलण्यात त्याच्या चातुर्य होत. सर्व मामले खुल्लमखुल्ला सडेतोड बोलणे लिहिणे असुनही महाराष्ट्रातील पत्रकार, संपादक, मंत्री ह्यांच्यासोबत त्याची खूप जवळिक होती. ह्या ओळखींमधून तो गरजूंची मदत करायचा. दांडग वाचन, कुठल्याही विषयावरील त्याच द्यान वाखाणण्याजोग होत. त्याच्याच आयुष्यावर सिंहासन चित्रपटातील निळू फुलेच पात्र उभारल अस मला वाटे.


त्याला आयुष्यात काहीच कमवायच नव्हत व गमवण्यासारख त्याच्याकडे काहीच नव्हत, ना घर ना दार ना पैसा ना कोणी हितचिंतक. कुठल्याही भावंडांच्या लग्नाकार्यातून पळापळीची काम करायचा, तळपणारया उर्जेच ते केंद्र होत, कधी मरगळलेल त्याच अवसान मी बघितलच नाही. लोकांकरता काही करण्यामागे त्याची कसलीच अपेक्षा नसायची तरीदेखिल त्याच्या भाळी फक्त उपेक्षाच आली. 

स्वभावाने तो कलंदर होता, एका ठिकाणी फार काळ टिकू न शकणे हे त्याच वैशिष्ट. मळके कपडे, पायात चपला कधीच नसायच्या, तोंडात सतत बीडी, आंघोळ करण्याचा कंटाळा, खिशात फार तर फार ५ रुपये. ट्रेनने बिनतिकिट प्रवास करायचा. त्याच्याकडे बघून वाटायच इतक्या हुशार माणसान आपल्या हुशारीचा फायदा करुन न घेता अस फकीर का जगाव? त्याला सगेसोयरे वेडा म्हणत पण तो वेडा नव्हता. त्याला वेडा म्हणणारयांहून चारपट हुशार होता, कदाचित अतिहुशारी हाच त्याचा दोष होता. त्याकाळी समाजामधून समजून न घेतल्या जाणारया कलाकारांचा तो प्रतिक होता.

ना कधी त्याने कोणाच वाइट केल ना चिंतल. काळाने, नशिबाने का त्याने स्वत:नेच ही त्यावर वेळ आणली? त्याने अस का केल? त्याला कोणी मार्गदशन का नाही केल? त्याच्या व्यसनांमधून त्याला कोणी मुक्त का नाही करवल? नानाविध प्रश्न आता मनात घोळतात.  विलक्षण जगला तसाच त्याचा अंत देखिल विलक्षण झाला. एका अपघातात तो पाय गमावून बसला. त्यानंतर काही वर्षांनी अस अवलंबून जीवनाचा कंटाळा आला व त्याने अन्न पाणी त्याग केल.

जोशी म्हणतात तस  वणवण फिरणाऱ्या अश्वत्थामा सारख त्याच आयुष्य, फरक एकच - 'तो' इतरांच्या जखमांवर फ़ुंकर घालत जगला. माझ्यासारख्यांच्या आयुष्यात inspiration म्हणून त्याची धग आजवर ज्वलंत आहे.

दिलीप पिंपळखरेच्या स्मृतीस अभिवादन.

सखी

Author: Rasika Mahabal / Labels:




गप्प्पा जीवनातल्या चिमुकल्या क्षणांच्या
मनस्वी नात्यांच्या  इंद्रधनुषी गोफांच्या
पायी टोचणाऱ्या काट्यांच्या 
पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाच्या

जाणते ती मनातले कवडसे,
रंग, रेषा, उकार, वेलांट्या
आठवणी लाडिवाळपणे भवती फिरणारया
मैत्र्या कस्तुरी दरवळणाऱ्या

तिच्यात चिवडयातल्या कढिलिंबाचा कुरकुरीतपणा, 
ओल्या नारळाचा चरबरीत गोडवा
उत्तम उदात्त सुंदर हे सख्य आहे
ती - एक सखी आहे. 




थोड वेळेआधी

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , ,


भारतातील रिती, रुढी, रिवाज, परंपरा, प्रथा ह्यांच्या नावाखाली स्त्रीयांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. उदाहरण द्यायची झालित तर भरपूर आहेत.

कुठल्याही लग्नात होणारया विधी बघितल्यात तुम्ही? पुरुष सर्व प्रकारचे विधी करतात व बाई फक्त त्याच्या हाताला हात लावून support दर्शवते. आजकालच्या जमान्यात बायका घर दार सगळ चालवतात, त्यांचा रोल कर्त्या बाईचा असतो, जे काय आयुष्यात घडत ते एक एकमेकांच्या equal मदतीने घडत त्यामूळे निम्म्या विधींमधे पुरुषांनी हाताला हात लावून बसायला हरकत नाहीये. लग्न लावुन देणारया पुरुष पूजारयांच्या ते पचनी पडायचे नाही. एखाद गोष्ट नुसती रीत आहे म्हणून follow करत बसायच कारण?

जन्मल्यावर वडिलांचे व लग्नानंतर नवरयाचे नाव लावायची अजून एक प्रथा. ह्या परंपरेच्या नावाखाली पुरुषांना पुरुषप्रधान समाज ठेवण्याची सोय मिळाली आहे. आईच नाव कुठेच का येऊ नये? शेवटी जन्म द्यायच सर्वात अवघड काम एक नारीच करते. अर्थात ह्या बदलाकरता पुरुषांचा विरोधच असणार कारण तस घडल नाही तर त्यांच्या नाहक अहंकारास ठेच पोहोचेल.

लग्न झाल्यावर मुलगी आता दुसरया घरची झाली वगैरे संवाद मला बोसट आणि मागासलेले वाटतात. मुलीच एक घर असत व मुलाच एक. कोणी कोणाच्या घरी न जाता दोघांच मिळून एक घर बनवायच असत. आईवडिलांसोबत वर्षानूवर्षां पासूनचे धागे दोरे तोडुन मुली बाहेर पडतात, पुरुषांची मात्र साधी नाळ सुध्धा तुटू नये? एकमेकांच्या आई वडिलांची गरजेनुसार सेवाशुश्रुषा करावी. फक्त मुलगा असेल तरच म्हातारपणाची काठी बनतो हे disprove केल्याशिवाय मुलगी झाली म्हणून तिचा निर्घुण बळी दिला जाणार नाही.

बायांनो तुम्ही married असाल तर मंगळसुत्री, टिकल्या, जोडवी घाला, आम्ही मात्र बोंगाडे फिरतो. ह्या प्रथा झिडकवणारया बायकांची छीथू करण अर्थातच पुरुषांच्या फायद्याच आहे पण बायकांकडूनही त्यांचा धिक्कार होतो तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अश्या बायका कदाचित बाई म्हणून जन्मण हे स्वलांछ्न, कमीपणाच व बांधीलकीच काम समजतात. 

एक एक दोन दोन वर्षांनी भारताबाहेर राहणारी जोडपी स्वकीयांसोबत वेळ घालवायला मायदेशी जातात. त्यात पुरुष सगळे दिवस स्वतःच्या घरी राहतात व मुलिंकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्या अर्धा अर्धा वेळ दोनीही घरी घालावतील. अशी बळजबरी करण्याच कारण? तुमच्या सारख्या त्याही त्यांच्या कुटूंबियांना भेटण्याकरता, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याकरता व्याकूळ आहेत. त्यांनी त्यांच्या ईच्छांना ठेचून, स्वतःच मन मारुन का जगाव?

बायकांना त्यांनी दिलेल बलिदान, त्यांची ममता, सहनशीलता अशी काही अवजड विशेषण लावून मग घाऊक पुजल जात, ओळखल जात, एक स्त्री म्हणून जन्मदात्यांकडून ते जडवल; घडवल जात. ह्या सर्वात त्यासूध्धा तुमच्यासारख्याच एक भावनाप्रधान मानव आहेत हे का विसरल जात?  एक पुरुष व बाई समाजातील स्वतंत्र्य व समर्थ घटक आहेत, त्यांना पदोपदी क्षणोक्षणी equal treatment मिळालीच पाहीजे व त्याकरता कोणीही स्वतःच्या साध्या भावनांचा बळी द्यायची गरज नाहीये.


समाजात घडणारया अनेक निर्दयी घटनांच कथन करायच राहिल ते पून्हा कधी करेन. तोवर तुम्ही मी म्हणते त्यावर शांत डोक्याने विचार करुन बघा ते नाही जमल तर तुमच्या शिव्यांची लाखोली comment मधे वहा. ती मी आनंदाने accept करेन. Revolution तर लवकरच घडणार आहे पण कदाचीत मी थोड वेळेआधी लिहीते आहे. कुठलीही inspiration वेळेआधी rebellious च वाटते.