पर्सनल स्टाईल ब्लॉग

Author: Rasika Mahabal /

सकाळी उठून कपाटातील कपड्यांकडे 'आज काय घालाव' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी चढवून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी अस बऱ्याच वेळा केल आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे.

पर्सनल स्टाईल ब्लॉग काय असतो?

लोक त्यांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या वस्तू कुठून घेतल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात. स्टाईल ब्लॉग्स कपडे लत्ते वगैरे अश्या अमूर्त म्हणवल्या जाणाऱ्या मूर्त गोष्टींबद्दल असतात.

आपण काय घालतो ह्याने कोणालाही फरक पडत नाही, मग त्याकरता वेळ का घालवा?

ड्रेस, शूज, नविन हेअरकट, दागिने ह्या तर फार क्षुल्लक गोष्टी आहेत, खरे बघता त्याने आयुष्यात काहीच फरक पडायला नको कारण लोक म्हणतात आपल्या बाह्य स्वरूपास नव्हे तर आपल्या आतील सौदर्याचे जास्त महत्त्व असते. पण आपली वेषभूषासुध्दा आपली एकाप्रकारे ओळख देत नसते का?

प्रामाणिकपणे सांगायच झाल तर प्रत्येक मुलीला कपडे, शूज ह्यात नेहमीच रस असतो!

मी स्टाईल मासिक का वाचायला लागले?

उपरोधिक वाटेल पण कुठल्याही दिवशी कपड्यांवर विचार वा वेळ दवडण्याची मला काडीमात्र ईच्छा नसते. पोषाखी नसलं तरी निटनिटके व टापटिप रहायला मात्र मला नक्कीच आवडते. असे अनेक वेळा घडले आहे की मी आणलेले कपडे तसेच पडून राहिलेत कारण कधी ते माझ्याकडील असलेल्या कुठल्याच वस्तूवर चांगले दिसले नाहीत किंवा बऱ्याचदा ते कशावर चांगले दिसतील हे मला कळाले नाही. तेव्हा मला वाटले की किती बरे होईल जर मला कोणि कशावर काय चांगले दिसत, ते कुठून आणायच, किती निरनिराळ्या प्रकारे वापरायच अश्या युक्त्या रोज दिल्यात. म्हणून मग मी स्टाईलची मासिक व ब्लॉग्स बघायला सुरुवात केली.

मी पर्सनल स्टाईल ब्लॉग का सुरु केला?

निर्मितीमधून मला जास्त आनंद मिळत असल्याने मी काय उपभोगल त्यावर एक ब्लॉग सुरु केला! मला वाटल माझ्यासारखे अजून बरेच जण 'काय घ्याव, काय घालाव' अश्या गोंधळातून गेले असतील.

मी तो डेव्हिल नाही जी प्राडा घालते, लुई व्ह्टोन बाळगून मी विधानं करत नाही, मी स्टाईलिस्ट नाही किंवा माझ्या ब्लॉगकरता मला पैसेही मिळत नाही, मग माझा स्टाईल ब्लॉग तुम्ही का बघावा? कारण मग मी तुमच्यासारखीच आहे म्हणून…

माझ्या स्टाईल ब्लॉग मधे वेगळ काय आहे?

माझी स्टाईल खूप साधी आहे, मला खूप दागिने, वेशभूषा किंवा मेकअप आवडत नाही. रोज दोन मिनिटात निट्निटक तयार होता येईल अश्या आइडियाज मी ब्लॉगवर शेअर करते. माझ्या ब्लॉग मधून मला लोकांना नविन वस्तू घेण्यास मला प्रवृत्त करायचे नसून एकाच गोष्टीचा किती विविध प्रकारे वापर करता येतो व क्लॉझेट मधे कुठल्या वस्तूंचा समावेश आवर्जून करावा ते दाखवायचं आहे.

काय चांगल दिसत हे पूर्णपणे माझ मत आहे आणि अर्थातच ती काही आदर्श वगैरे पध्दत नाहीये. पण तरीदेखील तुम्हाला त्यामधील काहीतरी आवडू शकेल व तुमच्या स्टाईलच्या व्याख्येप्रमाणे तुम्ही त्याला वापरू शकाल. स्टाईलिंग ही एक आब्स्ट्रॅक्ट आर्ट आहे आणि कला नेहमीच व्यक्तिनिष्ठ असते. मला स्टाइलिंग खूपस पेंटिंग सारख वाटत जिथे मला रंग व पॅटर्नसोबत खेळता येत.

क्लोझेटमधे अगदी थोड्या साहित्यातून निर्माण होणाऱ्या अनेक शक्यता मला ब्लॉगमधून दाखवायच्या आहेत.

ही माझ्या ब्लॉगची लिंक आहे  - http://lifestyleandallthatjazz.blogspot.com. तुम्हाला आवडल्यास तुमचे मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुमचा अभिप्राय जाणायला मला निश्चितच आवडेल!

मिलिंद बोकील

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

शाळा - शाळेत गेलेल्या सगळ्यांना आवडेल अस हे पुस्तक मी वाचल आणि मिलिंद बोकिलच्या प्रेमात पडले, त्यांची सगळी पुस्तक वाचण्याच मी ठरवल. ह्या पुस्तकावर निघालेला चित्रपट मला अजिबात आवडला नव्हता. जमल्यास पुस्तक जरूर वाचा.

एकम - काही पुस्तक तुम्हाला मंत्रमुग्ध करतात त्यापैकी एकम एक मला वाटल. खूप डीप मिनिंगची एका लेखिकेच्या आयुष्यावर आधारित ही एक कथा आहे. सुंदर अर्थाच सुंदर पुस्तक.

उदकाचिया आर्ती  - ह्या पुस्तकातील लघू कथा मला आवडल्यात.

मैत्री

Author: Rasika Mahabal /


जी लोक तुम्हाला सर्वात जास्त सलोख्याची वाटतात, ज्यांच्यासोबत तुम्हाला भावनिक गुंतवणूक आहे, ज्यांची गरज भासल्यास अगदी मध्यरात्रीही त्यांना संपर्क करण्यास तुम्हाला प्रशस्त वाटेल अश्या व्यक्तिंची यादी एका पेपरवर लिहा. ह्या एक्सरसाइझ करता सध्या कुटुंबातिल लोकांची नावे व्यर्ज करुयात. लिहिलित? किती नावे झालित?  माझ्या यादीत 10 हुन कमी नाव आहेत.

मधे 'पॉवर ऑफ हेबिट' नावाच्या पुस्तकात वाचण्यात आल की आपल्या मेंदुस एका वेळेस 12 अगदी घनिष्ठ नाती सांभाळता येतात.

आपला ताणतणाव व धकाधकीच आयुष्य लक्षात घेता किती लोकांना तुम्हाला चांगल्या प्रतिचा वेळ देता येतो? तुम्ही तुमचा वेळ व शक्ति यादीमधील लोकांवर खर्च करावी का विविधतेने आयुष्यात जास्त रंग भरतो?

एका घनिष्ठ मैत्रीमधे तुम्ही काय बघता? ज्या व्यक्तीला तुम्ही घनिष्ठ समजता ती तुम्हाला गावातील नुसता एक मित्र म्हणून बघते की त्यांनाही तुम्ही जवळचे वाटता ?

एका घनिष्ठ मैत्रीकरता कशाकशाची गरज असते?

दुसऱ्या व्यक्तिच्या आयुष्यात अगदी मनापासून रस वाटणे - त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने व्यक्त करण्याची गरज भासते.

दुसऱ्याच्या निर्णयांना स्विकारणे.

तुलना - मला तुझ्यापेक्षा जास्त चांगल किंवा वाईट आयुष्य, कुटूंब अथवा घर आहे. मैत्रिला तुलना कमजोर बनवते.

आदर - 'मी कष्ट करुन आज इथे पोचलो आहे, तू फक्त नशीबवान होतास' - जसा आयुष्यातील कुठल्याही नात्यात आदर महत्वाचा असतो तसाच मैत्रिमधे पण असतो. खाजगीत किंवा लोकांसमोर मित्राचा अपमान करणे मैत्रिस घातक आहे.

एक व्यक्ति म्हणून वाढ होणे - कुठलही नात तेव्हाच सफल होत जेव्हा त्यातील दोन्ही व्यक्तिंची निरनिराळ्या पातळ्यांवर वाढ होते जस की शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, बौद्धिक, भावनिक… आधार न देता तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला सतत कुबडी बनवलत तर  मैत्री टिकावू रहात नाही.

परतफेड - वरील सगळ्या गोस्टी जुळल्या असतील तर 'परतफेड' होते.  म्हणजे एकच व्यक्ती जर संपर्क ठेवण्यास प्रयत्नशील असेल, त्यांच्या आयुष्यातील घटनांमधे, उत्सवांमधे तुम्हाला सहभागी करायला बघत असेल आणि तुमच्याकडून त्याचा प्रतिसाद व परतफेड नसेल तर मैत्री टिकणे अवघड ठरते, दोन्ही बाजूंनी तेवढाच उत्साह असणे गरजेचे आहे.

आणि मुख्यत्वे दोघांकरता मैत्रीचा हां अनुभव सुखद असणे गरजेचे असते.

आपण बनवलेल्या यादीकडे परत येऊया. ही यादी कायम असते की काळ  व वेळेनुसार बदलत राहते? आणि बदलते तर ते प्रेम, आदर, स्वारस्य व तुमच्या त्या व्यक्तीसोबतचया भावनिक बांधिलाकिचे काय होते?

बरयाच गोष्टी मैत्रीला बदलतांना मी बघितल्या - छंद, सवयी, खाण्यापिण्याच्या आवडी, स्टेटस बदल - लग्नाळू/ लग्न झालेले/ मूल बाळ असलेले, नोकरी करणारे न नोकरी करणारे, भौगोलिक अंतर ह्या त्यापैकी काही आहेत. बरयाच वेळा वरील मुद्द्यांना जास्त चांगल्या प्रकारे match होणारे नविन मित्रमंडळी भेटल्यास तुम्ही आपसूकच त्यांच्या वर्तुळातून बाहेर पडता. अजून एक म्हणजे वयासोबत चर्चेचे विषय पण बदलतात, रात्री जास्त झालेल्या दारुपेक्षा आयुष्यावर बोलू काही चर्चासत्र बरे वाटते.

तुमचे तुमच्या लिस्ट मधील लोकांच्यामधे दुरावे आल्यास दुःख एखाद्या प्रेमभंगाएवढ असू शकत. तुम्ही ते कस हाताळता? काहीच घडल नाही अस? का काही महीने लागतात संबंध विसरायला?

संबंध बिघडलेत तर त्या व्यक्तिवरच प्रेम कुठे जात? मला वाटत तुमच्या मनातल्या एका कोपरयात ते जसच्या तस राहत आणि लोक पुढे जातात.

हां पोस्ट त्या लोकांना अर्पित जे माझ्या लिस्ट वर आहेत व होते. तुम्ही किंवा मी जाणूनबुजून अथवा अजाणता दुरावा केला असेल, माझी खजिली व्यक्त करते, पण तुम्हा सगळ्यांना एवढच सांगायच होत की माझ्या आठवणींना आज तुम्ही सुंदर बनवता. तुमच्या मैत्रीची मी आभारी आहे!

तो

Author: Rasika Mahabal /



रात्री अंथरुणावर पडेपर्यंत सोबत होता, वाचत राहिले तितका वेळ आजूबाजूला घुटमळला.

झोपले तेव्हा दिवसभरात कमावलेल सगळ काही घेऊन गेला. आज मी कफल्लक.
समोर नविन दिवस उभा पण ह्या अफाट विश्वात त्याला कुठे शोधू जो काल मावळला?

शापित

Author: Rasika Mahabal / Labels:


मधे ल. त्र्यं. जोश्यांनी लिहिलेला पेपरमधील त्याच्याबद्द्लचा लेख वाचला व त्याची आठवण झाली. त्याची फार सुंदर छबी जोश्यांनी मांडली, अगदी तसाच होता तो!

एकदम उगवायचा, मी रहायालाच आलो आहे सांगायचा. आल्या आल्या भूक लागली जाहीर करुन शिळ्या पोळीत खुष असायचा.

येतांना माझ्याकरता स्वत:ने रंगवलेल चित्र, काड्यांनी बनवलेली हातगाडी अस काही हमखास आणायचा. बाजूला बसवुन मला रंगकाम, crafts शिकवायचा. आता रिकामे डब्बे, कागद, काड्या ह्यांच्या वस्तू बनवल्या, कुठलही चित्र काढल की त्याच स्मरण होत. त्याने दिलेली भेट आयुष्याला विलोभनीय बनवणारे छंद देउन गेली.

शिक्षणाने व व्यवसायाने फ्रीलांस पत्रकार व उत्तम कार्टूनिस्ट अगदी लक्ष्मणच्या पातळीवरचा. बोलण्यात त्याच्या चातुर्य होत. सर्व मामले खुल्लमखुल्ला सडेतोड बोलणे लिहिणे असुनही महाराष्ट्रातील पत्रकार, संपादक, मंत्री ह्यांच्यासोबत त्याची खूप जवळिक होती. ह्या ओळखींमधून तो गरजूंची मदत करायचा. दांडग वाचन, कुठल्याही विषयावरील त्याच द्यान वाखाणण्याजोग होत. त्याच्याच आयुष्यावर सिंहासन चित्रपटातील निळू फुलेच पात्र उभारल अस मला वाटे.


त्याला आयुष्यात काहीच कमवायच नव्हत व गमवण्यासारख त्याच्याकडे काहीच नव्हत, ना घर ना दार ना पैसा ना कोणी हितचिंतक. कुठल्याही भावंडांच्या लग्नाकार्यातून पळापळीची काम करायचा, तळपणारया उर्जेच ते केंद्र होत, कधी मरगळलेल त्याच अवसान मी बघितलच नाही. लोकांकरता काही करण्यामागे त्याची कसलीच अपेक्षा नसायची तरीदेखिल त्याच्या भाळी फक्त उपेक्षाच आली. 

स्वभावाने तो कलंदर होता, एका ठिकाणी फार काळ टिकू न शकणे हे त्याच वैशिष्ट. मळके कपडे, पायात चपला कधीच नसायच्या, तोंडात सतत बीडी, आंघोळ करण्याचा कंटाळा, खिशात फार तर फार ५ रुपये. ट्रेनने बिनतिकिट प्रवास करायचा. त्याच्याकडे बघून वाटायच इतक्या हुशार माणसान आपल्या हुशारीचा फायदा करुन न घेता अस फकीर का जगाव? त्याला सगेसोयरे वेडा म्हणत पण तो वेडा नव्हता. त्याला वेडा म्हणणारयांहून चारपट हुशार होता, कदाचित अतिहुशारी हाच त्याचा दोष होता. त्याकाळी समाजामधून समजून न घेतल्या जाणारया कलाकारांचा तो प्रतिक होता.

ना कधी त्याने कोणाच वाइट केल ना चिंतल. काळाने, नशिबाने का त्याने स्वत:नेच ही त्यावर वेळ आणली? त्याने अस का केल? त्याला कोणी मार्गदशन का नाही केल? त्याच्या व्यसनांमधून त्याला कोणी मुक्त का नाही करवल? नानाविध प्रश्न आता मनात घोळतात.  विलक्षण जगला तसाच त्याचा अंत देखिल विलक्षण झाला. एका अपघातात तो पाय गमावून बसला. त्यानंतर काही वर्षांनी अस अवलंबून जीवनाचा कंटाळा आला व त्याने अन्न पाणी त्याग केल.

जोशी म्हणतात तस  वणवण फिरणाऱ्या अश्वत्थामा सारख त्याच आयुष्य, फरक एकच - 'तो' इतरांच्या जखमांवर फ़ुंकर घालत जगला. माझ्यासारख्यांच्या आयुष्यात inspiration म्हणून त्याची धग आजवर ज्वलंत आहे.

दिलीप पिंपळखरेच्या स्मृतीस अभिवादन.

सखी

Author: Rasika Mahabal / Labels:




गप्प्पा जीवनातल्या चिमुकल्या क्षणांच्या
मनस्वी नात्यांच्या  इंद्रधनुषी गोफांच्या
पायी टोचणाऱ्या काट्यांच्या 
पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाच्या

जाणते ती मनातले कवडसे,
रंग, रेषा, उकार, वेलांट्या
आठवणी लाडिवाळपणे भवती फिरणारया
मैत्र्या कस्तुरी दरवळणाऱ्या

तिच्यात चिवडयातल्या कढिलिंबाचा कुरकुरीतपणा, 
ओल्या नारळाचा चरबरीत गोडवा
उत्तम उदात्त सुंदर हे सख्य आहे
ती - एक सखी आहे. 




थोड वेळेआधी

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , ,


भारतातील रिती, रुढी, रिवाज, परंपरा, प्रथा ह्यांच्या नावाखाली स्त्रीयांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. उदाहरण द्यायची झालित तर भरपूर आहेत.

कुठल्याही लग्नात होणारया विधी बघितल्यात तुम्ही? पुरुष सर्व प्रकारचे विधी करतात व बाई फक्त त्याच्या हाताला हात लावून support दर्शवते. आजकालच्या जमान्यात बायका घर दार सगळ चालवतात, त्यांचा रोल कर्त्या बाईचा असतो, जे काय आयुष्यात घडत ते एक एकमेकांच्या equal मदतीने घडत त्यामूळे निम्म्या विधींमधे पुरुषांनी हाताला हात लावून बसायला हरकत नाहीये. लग्न लावुन देणारया पुरुष पूजारयांच्या ते पचनी पडायचे नाही. एखाद गोष्ट नुसती रीत आहे म्हणून follow करत बसायच कारण?

जन्मल्यावर वडिलांचे व लग्नानंतर नवरयाचे नाव लावायची अजून एक प्रथा. ह्या परंपरेच्या नावाखाली पुरुषांना पुरुषप्रधान समाज ठेवण्याची सोय मिळाली आहे. आईच नाव कुठेच का येऊ नये? शेवटी जन्म द्यायच सर्वात अवघड काम एक नारीच करते. अर्थात ह्या बदलाकरता पुरुषांचा विरोधच असणार कारण तस घडल नाही तर त्यांच्या नाहक अहंकारास ठेच पोहोचेल.

लग्न झाल्यावर मुलगी आता दुसरया घरची झाली वगैरे संवाद मला बोसट आणि मागासलेले वाटतात. मुलीच एक घर असत व मुलाच एक. कोणी कोणाच्या घरी न जाता दोघांच मिळून एक घर बनवायच असत. आईवडिलांसोबत वर्षानूवर्षां पासूनचे धागे दोरे तोडुन मुली बाहेर पडतात, पुरुषांची मात्र साधी नाळ सुध्धा तुटू नये? एकमेकांच्या आई वडिलांची गरजेनुसार सेवाशुश्रुषा करावी. फक्त मुलगा असेल तरच म्हातारपणाची काठी बनतो हे disprove केल्याशिवाय मुलगी झाली म्हणून तिचा निर्घुण बळी दिला जाणार नाही.

बायांनो तुम्ही married असाल तर मंगळसुत्री, टिकल्या, जोडवी घाला, आम्ही मात्र बोंगाडे फिरतो. ह्या प्रथा झिडकवणारया बायकांची छीथू करण अर्थातच पुरुषांच्या फायद्याच आहे पण बायकांकडूनही त्यांचा धिक्कार होतो तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अश्या बायका कदाचित बाई म्हणून जन्मण हे स्वलांछ्न, कमीपणाच व बांधीलकीच काम समजतात. 

एक एक दोन दोन वर्षांनी भारताबाहेर राहणारी जोडपी स्वकीयांसोबत वेळ घालवायला मायदेशी जातात. त्यात पुरुष सगळे दिवस स्वतःच्या घरी राहतात व मुलिंकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्या अर्धा अर्धा वेळ दोनीही घरी घालावतील. अशी बळजबरी करण्याच कारण? तुमच्या सारख्या त्याही त्यांच्या कुटूंबियांना भेटण्याकरता, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याकरता व्याकूळ आहेत. त्यांनी त्यांच्या ईच्छांना ठेचून, स्वतःच मन मारुन का जगाव?

बायकांना त्यांनी दिलेल बलिदान, त्यांची ममता, सहनशीलता अशी काही अवजड विशेषण लावून मग घाऊक पुजल जात, ओळखल जात, एक स्त्री म्हणून जन्मदात्यांकडून ते जडवल; घडवल जात. ह्या सर्वात त्यासूध्धा तुमच्यासारख्याच एक भावनाप्रधान मानव आहेत हे का विसरल जात?  एक पुरुष व बाई समाजातील स्वतंत्र्य व समर्थ घटक आहेत, त्यांना पदोपदी क्षणोक्षणी equal treatment मिळालीच पाहीजे व त्याकरता कोणीही स्वतःच्या साध्या भावनांचा बळी द्यायची गरज नाहीये.


समाजात घडणारया अनेक निर्दयी घटनांच कथन करायच राहिल ते पून्हा कधी करेन. तोवर तुम्ही मी म्हणते त्यावर शांत डोक्याने विचार करुन बघा ते नाही जमल तर तुमच्या शिव्यांची लाखोली comment मधे वहा. ती मी आनंदाने accept करेन. Revolution तर लवकरच घडणार आहे पण कदाचीत मी थोड वेळेआधी लिहीते आहे. कुठलीही inspiration वेळेआधी rebellious च वाटते.

. एक होता पाऊस .

Author: Rasika Mahabal / Labels: ,


आपल्या सगळ्य़ांनाच तो आवडतो. त्याच्या बरसण्याआधी आसमंत खुलतो. हळूवार गार वाऱ्यासोबत वेली, पान, फुल मंद झुलतात. त्याच्या आगमनाकरता पक्षी किलबिलतात. थेंबथेंब तो बरसतो, ओंजळित  साठलेला तो हाताला अलगद स्पर्श करुन ओघळतो.

त्याच्या ह्या सर्व करामती मला लहान बाळाचा सहवास वाटतात. बाळाचा सुवास, त्याचा मऊसूत स्पर्श, त्याच हसर बेफिकीर अल्लड रुप सगळ कस त्या हळूवार पावसाप्रमाणे असत.

असा तो खेळकर आल्हाददायी बरसत रहातो. मग सुरु होतो विजांचा कडकडाट, त्याच रपारप कोसळण, धरतीवर विजयश्री मिळवल्याचा त्याचा हा हास्यकल्लोळ . त्याच ते उन्मत्त आक्राळविक्राळ रुपांतर! वाटत त्याचा तो गोजिरेपणा गेला कुठे?

नुकत्या यौवनात प्रवेश केलेल्या युवकाप्रमाणे त्याच हे वागणं भासत.

गरजून बरसून डोंगराच्या कडेवर तो येउन ठेपतो. समोर सुंदर देखावा, वरती भव्य निरभ्र आकाश आणि खाली खोल दरी. ह्या दैदिप्यमान नजाऱ्याने तो अवाक असतो, आता त्याला सर्व काही स्पष्ट दिसत असत. इथवर येइपर्यंत केलेल्या नासधुसीने तो खजील असतो. ह्या कड्यावरून कधीही पडणार ह्याची जाणीव झालेला तो त्याच्यासारख्या अनेकांना दरीत कोसळतांना बघतो, त्याच्या पाठिमागुन येणारेही तेच करणार असतात.

नदीस मिळाला का समुद्रास मिलीन झाला, मातीत झिरपला का मातीमोल झाला? कोणास ठाउक कारण तो असा हरवला की जणू त्याचा कधी लवलेशही नव्हता. जाण्याआधी त्याच स्वप्न मात्र पूर्ण करुन गेला, क्षणभर का होईना पण इंद्रधनुष्य सोडून गेला...

न-आस्तिक

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,

आईबाबांना मी नेहमीच पूजा पोथी पाठ करतांना पाहिल. श्लोकच्या श्लोक पोथ्याच्या पोथ्या माझ्या नुसत्या ऐकुन पाठ आहेत. दर वेळेला मंदिरात प्रवेश केला की खूप प्रसन्न वाटत. तिथला गंध, मृदंग, मंजुळ घंटानाद; मंदिर जुनं आणि पाण्यातिरी असेल तर मन अजून प्रफुल्लीत वाटत. पण तिथे आलेले भक्त बघितलेत की मला जाणवत ते रिकामपण. मूर्तीच्या रुपात भक्तांच निर्मितीकाराला बघण हाच कर्ता धर्ता असा अतूट विश्वास त्यांच्या डोळ्यात बघितला की ती धुंदी, ती दृढ श्रद्धा माझ्यात नाही ह्याचा मला खेद वाटतो. त्या नितांत भक्तीचा अनुभव घेण निश्चीतच विशेष असेल पण त्याचा माझ्यात लवलेशही नाही. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली म्हणून अनुभवायची अस म्हणून ती निर्माण पण  होऊ शकत नाही. त्यामुळे मला मुर्त्यांसमोर, मंदिरांमधे भयंकर आउट ऑफ प्लेस सुध्दा वाटत.

अर्थात भारतामध्ये अस विश्वास नाही म्हणून जगण सोप्प नाही. तिथल्या संस्कृतीत दुसऱ्या विचारांना जणू स्थान नाही. तुम्ही नास्तिक म्हणून वाळीत टाकले जाउ शकता किंवा हा कोण स्वत:ला शहाणा समजतो असहि म्हटल जाउ शकत. (हा पोस्ट टाक्ण्याआधीहि मी दोन वेळा विचार केला). अतिशय धार्मिक कुटूंबात जन्माला आलात तर मग संपल. एमोशनल ब्लेकमेल करून तुम्हाला मंदिरात किंवा पूजा पाठामध्ये खेचलच जाइल. देवाच असं  केल नाही तर अघटित घडत अस मनात बिंबवल जात.  भीती दाखवुन विश्वास बसायला लावण हे कितपत योग्य आहे?  पूजाअर्चेमधे  खेचलं गेल्यास खजील वाटत असत कारण मन ओसाड आणि चेहेऱ्यावर भक्ती दाखवणं मला कोणाच्यातरी विश्वासाला, पवित्र भावनेला ठेच पोचवल्या सारखं वाटत. 

ह्या जगाची निर्मिती का झाली  ह्याच ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये. जे लोक ते कळाल असण्याचा दावा करतात त्यांच्याकरता वेल एंड गुड. देवाने हे सगळ निर्माण केल तर देवाला कोणी केल?, जगाची निर्मिती, ग्रहांची निर्मिती त्यावरचे जीवजंतू, माझ येथिल अस्तित्त्व, त्या अस्तित्त्वाला काही अर्थ आहे का नाही अश्या बऱ्याच गोष्टिंवर मी विचार करते त्यावर वाचन करते. त्यामुळे देवावर विश्वास नाही म्हणणारे लोक सखोल विचारी नसतात किंवा माजोरडे असतात अस काही मला वाटत नाही, ते सुद्धा सगळ्या पौसिबिलिटिज ना कंसिडर करत असतात. कदाचित देवाधर्माच्या मार्गावरुन जाऊनही आलेले असतात. निर्मिती च उत्तर पाठ्पठनामधून मिळवाव, मनन चिंतन वा वाचनातून मिळवाव. किंवा कोणी म्हणाव मला जन्म मिळाला आहे आता मी 'अबब केवढ हे सौदर्य' अस म्हणत जगणार, ना मला कुठला प्रश्न आहे ना कुठल्या उत्तराची अपेक्षा. मला ह्या जगावर ह्या निसर्गावर विश्वास आहे त्याकरता अजून कुठल्या जगावर विश्वास न ठेउन जगणं इतकस वाइट नाहीये. देवाच्या अस्तित्त्वासारख्या मेजर गोष्टिबाबत इतर लोकांवर, व मुख्यत्वे तुमच्या पोरांवर तुमचे विचार लादु नये अस वाटत. त्यांना त्यांचे विचार असण्याच व्यक्तीस्वातंत्र मिळाव,  ते एक्स्प्रेस करण्याची मुभा द्यावी,  त्यांच्या मतांना विचांरांना तेवढच शालीन व पवित्र समजावं व त्यांच्या फक्त निसर्गावर श्रद्धा ठेवण्याच्या निर्णयाला तेवढाच मान सन्मान मिळावा अशी मी आशा करते!

दोन प्रवासी

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



गोष्ट आहे दोन व्यक्तिंची
पहिला व दुसरा ही नावे त्यांची

त्यातील एक असे खुप महत्त्वाकांक्षी
आयुष्यातील छोट्या सुखांना तो त्याकरता बक्षी
दुसरा नसे यत्किंचीतही महत्त्वाकांक्षी
आनंद त्याचा वारा, समुद्र व त्यावरील पक्षी

मैत्री जमली दोघांची घनिष्ठ
बघु कोण होते त्यामधील कनिष्ठ

निघाले एक दिवस दोघे लक्ष घेऊन काशी
पहिल्यास होती ती गाठायची जरी राहिलेत ते उपाशी
दुसरयास येणारा प्रत्येक क्षण ठेवायचा होता मनाशी
एकच लक्ष पण विरुध्द व्यक्तिमत्त्वाचे हे दोन प्रवाशी

दुसरा आनंदे जेव्हा उमले कळी
किंवा कुठुनशी सरपटतांना दिसे अळी
आकाशी उठे निरनिराळ्या छटांची जाळी
पहिल्यास कळे ह्यातील धुंदी जेव्हा बघे तो दुसरयाच्या भाळी

नसे उरत दुसरयास वेळेचे भान
जिथे बघी तो फुले पाने किंवा रान
बस तिथेच मारी तो ठाण
नव्हती पहिल्यास ह्यातील काहीच जाण

पहिला म्हणी दुसरयास निघु इथुन लवकर
हे सर्व करण्यास पाहिजे तर येउ नंतर
काशी येण्यास पार करायचे आहे बरेच अंतर
ध्येयपुर्तीची मस्ती असते खुप चिरंतर

सारखाच घेत बसलो आपण जर विसावा
तर अंत नाही ह्या प्रवासा
स्वप्नपुर्तीची उन्मत्तता न येई तुझ्या निवासा
छोट्या गोष्टींतुनच मिळत असे तुला दिलासा

अजुन विचार करताय कोण होते श्रेष्ठ कोण होते कनिष्ठ?

पहिला एकटा असता तर भलेही गाठली असती त्याने गंगोत्री
दुसरा एकटाच बघत बसला असता रम्य रात्री
पहिला मुकला असता पण छोट्या सुखांस
आलीच नसती काशी दुसरयाच्या नशिबास

एकमेकांना पुरक होते हे दोन सोबती
एक दुसरयाच्या नादाने सर्वी सुख त्यांना लाभती
एकाच ध्येयाचे एकत्र हे प्रवासी
असतील तुमच्याही घरात असे दोन रहिवासी

पुस्तके

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

महाराष्ट्र देशा - उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात एवढी सुंदर ठिकाण आहेत ह्याचा अविष्कार झाला. अज्ञानात सुख असते म्हणतात ते खर आहे, कारण पुस्तक वाचल्यापासून मला त्या सर्व ठिकाणांना भेट द्यावी वाटत आहे.
काही फोटो बघून अवाक व्हायला होता. गुड जॉब ठाकरे!





आणि तरीही मी! - सौमित्र

अनार्थातून अर्थ काढलेत
अर्थातून अनर्थ (रीड डबल मीनिंग)
काहीतून घडला अविष्कार
काहींवर घालावा वाटला बहिष्कार, अशा कवितांमध्ये काहीतरी सखोल गहिरा विचार असावा व तो समजायची आपली कुवत नसावी असा विचार करून सोडून दिल्या
एवढे सर्व घडले 'आणि तरीही मी!' संपूर्ण वाचून काढले.

फेब्रुवरी २०१२

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,


चतुर्भूज - व.पु.काळे

तस पाहील तर लघुकथा लिहिण अवघड काम आहे, ४ पानांच्या गोष्टीतून कथा पात्र उभ्या करुन त्याची वाचकाला भुरळ पाडण क्लिष्ट काम आहे. मला लघुकथा लिहायला व वाचायला खुपच आवडत, हॉलीवूड व बॉलीवूड सिनेमातील फरकाप्रमाणे वाटत. १.५ तासात संपू शकणारा सिनेमा फालतू गाणी, कॉमेडी सिन्स ने भरवून ३ तास दर्शकांचा अंत बघितल्यासारख, अर्थात सर्वच कथा लघू असू शकत नाहीत जस की इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहाला खंडच्या खंड कमी पडतील.
’जो उन्हातून वणवण फिरलाय तो सावलीतल रहस्य ओळखतो. ज्यान मरण जवळून बघितल आहे त्याला जीवन कळत.’
निरनिराळी व्यक्तीचित्र व.पुंनी त्यांच्या कथांमधून मांडली आहेत. ह्या गोष्टींच मेतकूट त्यांना छानच जमल आहे. आय थिंक इट इज वपुज वन ऑफ द बेस्ट.


गणगोत - पु.ल. देशपांडे
पुलंच्या आयुष्यात आलेल्या विविध व्यक्तिचित्रांवर पुस्तक आधारित आहे, मला त्यातील व्यक्तिचित्रणांनी फारसे प्रेरित केले नाही!तुम्हाला केल्यास बघा...

आभाळ - शंकर पाटील
गावाकडल्या गोष्टी लिहिण्याकरता पाटील प्रसिध्द आहेत. मला त्यांची भाषा व गोष्टी दोन्ही भावल्या नाहीत. (मी स्वत: खेड्यापाड्यातून वाढ्ले असुनही). गावाकडच्या आयुष्याचा सार चांगल्या रितीने मांडणारे अजून कोणी लेखक आवडीचे असतील तर कळवा.

आपुलकी - पु. ल. देशपांडे

Author: Rasika Mahabal / Labels: ,





मराठी भाषेच ज्ञान असलेल्यांनी पुल वाचल नसेल तर मराठी समजण्याच्या सर्वात मोठ्या फायद्यास ते मुकले आहेत.
पु. लंची ख्याती मी काय लिहावी. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून आणि प्रत्येक वाक्यातून ते पुन: पुन: प्रभावित करतात. हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात आलेल्या निरनिराळ्या लोभस व्यक्तिमत्त्वांवर आहे. त्यातील एकाही व्यक्तीबद्दल मला अ का ब माहीत नसतांना त्या माझ्या मनात तरंग उठवून गेल्यात. आपुलकीने लिहिलेल हे पुस्तक त्यातील चरित्रांबद्दल आपुलकी निर्माण करुन जाते.

ही वाट एकटीची - व पु काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,

महाराष्ट्र पुरस्कार लाभलेल पुस्तक. जीवनातील तत्वांशी जास्तच चिकटलेल पात्र वपुंनी उभ केल आहे. प्रत्येक गोष्टीतील पात्रांच एक वेगळ आयुष्य, आगळे वेगळे विचार असतात आणि तस त्यांना वागण्याचा लेखकाने अधिकार दिला असला तरी ती पात्र वाचकांना नकोशी होवू शकतात. कधी कधी पुस्तकातील पात्रांचा वैताग आला की पुस्तक वाचु नये अस वाटत. तसच माझ झाल. शेवटी वाटेवर ती एकटी राहिली ते साहजिकच होत आणि बर झाल एकटी राहिली अस वाटून गेल.

आजीचा बटवा आणि झाडाखालची फुल वेचणारे आजोबा...

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,


तिथल्या सकाळच्या फेरफटक्यात सुर्याच्या पहिल्या किरणापासून उत्साह झळकतो. झाडाच पान आणि पान जणू आनंदात डूलत, पक्षी सकाळच्या सुर्यकिरणांच्या आगमनात गातात, वारा थंडावा निर्माण करण्याच्या प्रयत्नात गुंततो. आसमंत खुलतो, त्यासोबत माझ मनही झुलत, पाखरांसारख चहुओर भिरभिर उडावस वाटत, झाडासारख निपचित पडून सुर्यप्रकाशात पहुडावस वाटत. सर्वीकडे शांतता, प्रसन्नता, निर्मलता. दुरुन कुठुनसा मंदिराच्या घंटांचा नाद तर कधी ऐकू येते त्यास आरत्यांची साथ, उदबत्त्यांचा वास... प्रत्येक सकाळ बेभान करते अगदी सकाळ पेपरसुध्दा.

सकाळी रिकाम्या रस्त्यावर तर कधी पर्वती; लॉ कॉलेज टेकडीवर मारलेला फेरफटका, घरी येइपर्यंत होणारी वर्दळ, रिक्षावाल्यांनी बिल्डींग खालून मारलेल्या पोरांच्या नावाने हाका, कूठे भाजीवाले, फेरीवाल्यांच्या आरोळ्या, हॉर्नचे आवाज, कचरा घेणारे, पेपरवाले, दुधवाल्यांची वर्दळ. कूकरच्या शिट्ट्या, आमटीचा वास, शाळेत जाणारयांची, ऑफिसला पळणारयांची एकच चेहेलपेहेल. हळूहळू पॉप्युलेशन, पोल्युशन, ट्रफिकच्या राक्षसांच रुद्र रुप जाणवत.
दुपारच्या कडक उन्हाच्या मारयात घराघरात घुइघुइ फिरणारे सिलिंग फॅन्स, कूठूनसे येणारे जेवणाचे खमंग वास, मग कामवाल्या बायकांची एकच रांग, एवढ्या प्रकाशात प्रकर्शाने जाणवतात ते भडक रंग बिल्डींग्सपासून लोकांच्या कपड्यांपर्यंत. जरा थोडा वेळाची शांतता मिळते न मिळते तोच शाळेतून घरी आलेल्या मुलांचा कॉलनी मधे धुमाकूळ, घराघरातून येणारे मराठी सीरीयल्सचे आवाज. निजानीज झाली की काळोख्या रात्री रस्त्यावर पसरलेल कूत्र्यांच साम्राज्य, मांजरांनीसुध्दा बंड पुकारुन त्यांना दिलेला प्रतिसाद... शुभ्र चांदण, रस्त्यांवरून स्ट्रीट लाइटसचा लख्ख प्रकाश, त्यावर झेपावून रातकिड्यांची आत्महत्या...हवेतील गुलाबी थंडी, निर्मनुष्य वेळ एन्जॉय करत पडलेल्या निपचीत वाटा.

करप्शन, कचरा, गरीबी हजार प्रॉब्लम्स असले तरी आठवतो तो विजांचा थयथयाट, पावसाचा टिनावर पडलेला रपारप आवाज, मातीचा पहिल्या पावसानंतर येणारा सुवास, चुलीखाली लाकड जाळून पाणी तापवणारया बायांचा त्रास, रस्त्यावर भाजलेल्या कणसाचा वास, उसाच्या गुरहाडाचा आवाज, भाविकांची भक्ती, आईची माया, रस्त्याच्या मधे रवंथ करत पडलेल्या गाई त्यांना डिस्टर्ब न करता येणारया जाणारयांची घाई, तर कधी ह्या रसिका करता ४ केळी घेऊन भेटायला आलेली जुनी कामवाली बाई.

लक्षात राहतो आजीचा बटवा आणि झाडाखालची फुल वेचणारे आजोबा...

clubbing

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,


एक टकिला शॉट डान्स फ़्लोरवर बिंधास्त बेधडक उतरुन, लाज; लज्जा; शरम सोडून ताल पकडायची हमी देतो. हळूहळू पाय थरकायला लागतात. अधूनमधून हळूच चौफेर नजर टाकून मी चोरुन बघून घेते की कोणी माझ्याकडे बघत तर नाहीये ना. खात्री मिळाली की मग एकदम ताल से ताल मिला!

सर्व जण बेधुंद हो ऊन त्या गाण्यांवर जल्लोषात थिरकत असतात, सिंगल मुल सहसा ग्रुप करुन गणपती डान्स करत असतात. कपल्स एकमेकांना चिकटून झुलत असतात. बरयाच मुली स्ट्रीप डान्स सारख्या काहीतरी बिभत्स स्टेप्स तोडक्या कपड्यात करत असतात तर काही स्टेजवर उगीचच चढुन जरा वेळ मटकून घेतात.

काहींचे नाच मला कूल काहिंचे मनापासून हावभावासकट तर काहींचे नाटकी अश्लिल वाटतात. काही मुल फक्त पोरी बघायला आले असतात मग त्यांची गाडी काही बारच्या पुढे हलत नाही. गायी रवंथ करत बसतात तशी ही पोर दारुचे घुटके घेत चहुओर भिरभिर नजर टाकत बसले असतात. काही माझ्यासारखे जीन्स साधा टॉप आणि नाचतांना कंफर्टेबल वाटतील असे शुज (मी बरयाच वेळा स्नीकरस घालुन जाते!)
क्लब मधे बरयाच वेळा तेचतेच चेहरे दिसतात. एकमेकांची नावदेखिल माहित नसून किंवा माहिती करायची इच्छादेखिल नसून ते एकमेकांबरोबर नाचायला लागतात. बरोबर नाचणारी व्यक्ती चांगली नाचते का वाईट ह्याच्याशी घेण देण नसत, जुळायला लागते ती फक्त एक गोष्ट - रीदम.

जरा वेळाने दारु उतरुन देखिल शरिराला मिळाला असतो रिदम चा हाय. तोवर थोड्या नजरा तुमच्याकडे वळल्या जरी असल्या तरी फरक पडत नाही.. गाण्याच्या तालावर एक्सप्रेशन्स सकट मी धुंद हून नाचत राहते. गर्दी आणि घाम म्हणत असतो मी, त्यात कानठळ्या बसणारे स्पीकरस, तरीसुध्दा पाय हलत राहतात, लोकांच्या जल्लोषात कधी ते तुडवले पण जातात तरीसुध्दा ते थांबत नाहीत.

२ वाजलेत की गाणी बंद होतात, लोकांच्या उत्साहावर पाणी पडत. मेहफील खर तर आत्ताच रंगात आलेली असते. क्लब्स ४ वाजता बंद झालेत तरी लोक अजुन एका गाण्याची रीक्वेस्ट करतांना सापडतातच. गाणी संपलीत तरी मी गाडीत बसेपर्यंत नाचत राहते- त्या युफोरिया मधुन बाहेर पडायला मला वेळ लागतो. बाहेर पडल की हलक फ्रेश आणि स्ट्रेसफ्री वाटत असत, कानामधे असते प्रचंड सुन्नता आणि मनात पुन्हा येण्याची उत्सुकता...

एका मुंगीचे महाभारत

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

प्रत्येक भाषा सुंदर असते, प्रत्येक भाषेच्या गमती जमती असतात. कुठलीही भाषा कदाचित तेव्हा एन्जॉय करता येते जेव्हा त्याचे अगदी गावराण रुपांतरापासून प्रदेशाप्रमाणे डायलेक्ट तुम्हाला कळतात.

विदर्भातली मराठी, गावाकडली मराठी, पुण्यातली अस्सल पुणेरी मराठी, कोकणातली मराठी आणि ह्या सर्वीकडील लोकांच्या निरनिराळ्या तरहा - खाण्यापासून वागण्यापर्यंत मला माहीत असल्याने मराठी पुस्तक मी सर्वात जास्त एन्जॉय करते.

मला मराठी समजत नसती किंवा वाचता आली नसती तर मी आयुष्यात काय मिस केल असत? खर तर काहीच नाही - पु.ल. देशपांडे सोडल तर! पु.लंची सर्वच पुस्तक सुंदर असली तरी बटाट्याची चाळ सर्वात सुंदर आहे.
वपु, सुहास शिरवळकर ह्यांची सर्वी पुस्तक मी मिस केली असती. मराठी भाषेचा अस्सल आस्वाद कवितांमधून लुटता येतो. शांता शेळके, मर्ढेकरांपासून अगदी आत्ताआत्तापर्यंतचे कवी किशोर कदम.

मला अजुन भाषा कळाल्या असत्या तर बर झाल असत कारण त्या न समजुन मी बरचस लिटरेचर मिस करते आहे. २०१२ मधे हिंदी पुस्तक वाचण्याचा प्लॅन आहे.

इतक्यात गंगाधर गाडगीळांच एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक वाचल. त्यांची मी इतर कुठलीही पुस्तक वाचली नसल्याकारणाने त्यांना व्यक्ती म्हणून किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची जिद्न्यासा मला नव्हती. पण तरीदेखिल हे पुस्तक मला खुप आवडल. काही आत्मचरित्र तुम्हाला प्रोत्साहित करतात जस की इडली ऑर्किड आणि मी, काही अवाक करतात जस की कोल्हाट्याच पोर, तर काही वाचल्यावर वाटत ह्या व्यक्तीने आत्मचरित्र का लिहाव? जस की नाच ग घुमा, काही आत्मचरित्रांशी तुम्ही रीलेट करु शकता, तसच हे पुस्तक माझ्याकरता होत.

ब्रिटीश काळातील मुंबई, तिथली लोक, मराठी लोकांचे इतर भाषीयांशी संबंध, तेव्हाच राहणीमान, कॉलेज लाईफ, कॉलेज विद्यार्थांकडून होणारया ब्रिटीशांविरुध्द चळवळी, तेव्हाच्या पुढारयांबद्दलचे विचार आणि हे सर्व एका कॉमन मॅनच्या द्रुष्टीकोनातून.

लिखाण ही माझी प्रचंड आवडीची गोष्ट आहे, त्याकरता मी रोज आवर्जुन वेळ काढते. लिहिल्याशिवाय मला दिवसाच पुर्णत्व जाणवत नाही. लिखाणावर तेवढच प्रेम करणारे गाडगीळ, त्यामुळे लिखाणासाठी येणारा मेंटल ब्लॉक, वेळ न मिळाल्यास होणारी चिडचिड, येणारी डिसट्रॅक्शन्स इत्यादींबरोबर व एक आयुष्याचा आराखडा व कौटुंबिक जीवन ह्या गोष्टी पण मला समान वाटल्यात. त्यांच्या आयुष्यातील अनंत डीटेल्सने मी बोर पण झाले. पुस्तक खरोखरच महाभारतासारख जाडजुड आहे. पण त्यांची अजुन पुस्तक मी वाचेन की नाही मला शंका आहे कारण वपु, सुशि ह्यांच्यासारख भाषेवरील प्रभुत्व मला जाणवल नाही. पुस्तक अवांतर डीटेल्स स्किप करुन वाचण्याकरता नक्कीच वर्थ आहे.

कर्मचारी - व. पु. काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,


काही गोष्टी वाचलेल्या/ऐकलेल्या जस की भांडकुदळ जोशी, काही व.पुंच्या इतर पुस्तकांमधुन रीपिट, आणि काही व.पुंची खुप पुस्तक वाचल्यामुळे प्रेडिक्टेबल वाटणाऱ्या. प्रत्येक लेखकाच्या बाबतीत तस होउ शकत, जस की पुलंची ४ पुस्तक एकानंतर एक वाचल्यावर कोणत्या लाईनीनंतर कोणत्या प्रकारचा जोक येणार आहे हे रसिक वाचक ओळखु शकतो...
हे पुस्तक माझ्या मनाला खुप भिडले नाही पण तुम्ही नक्कीच वाचून बघा आणि मला तुमचा अभिप्राय अवश्य कळवा.

नावेतील तीन प्रवासी - द. मा. मिरासदार

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



(हे पुस्तक एका इंग्रजी पुस्तकाचा केलेला अनुवाद आहे)

खर तर कथानकाचा पाया एकदम भक्कम आहे - ३ रुटीनला कंटाळलेले मित्र काही दिवसांच्या प्रवासाला निघतात ते पण नावेतून. ह्या थिमसोबत बरच काही करता आल असत पण अफसोस, द. मा. निराशा करतात. ना त्यातली पात्र ठळकरित्या उभी राहतात ना त्यांनी प्रवासात केलेल्या गोष्टी. ना त्यात गम्मत आहे ना सबस्टन्स. तुमच मत वेगळ पडल तर मला जरूर कळवा.

शाळा - मिलींद बोकील

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,



मला हे पुस्तक प्रचंड आवडल. मी शाळेत जायचे तेव्हा कधी एकदा शाळा संपुन मी घरी पळते आहे अस व्हायच, पण ही शाळा कधीच संपु नये अस वाटत होत. जी पुस्तकातली साईड कॅरॅक्टरस वाटली होती ती गोष्टीच्या शेवटी अचानक खुप काही सांगुन गेलीत. शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्यात, पुन्हा चक्क अभ्यास पण करावासा वाटतो आहे!
हे पुस्तक आहे शाळेत गेलेल्या सर्वांसाठी...
शाळा चित्रपट शाळा पुस्तकाचा झालेला अपमान आहे.