जो थांबला तो संपला

Author: Rasika Mahabal / Labels: ,



वेळ सुसाट पळत सुटला आहे. त्याला मुठीत धरण्याचा नाहक प्रयत्न मी सोडून दिला आहे. वेळेबरोबर मी सुध्दा पळत आहे, अगदी जीव मुठीत घेऊन.

कधीकधी नुसतच क्षणभर थांबून बघते की तो किती जोरात पळत आहे आणि आत्तापर्यंत किती जोरात पळत आला आहे. तो दमत कसा नाही? जरा सावकाश का जात नाही? त्याला जरा दमाने घे अस सांगण मी सोडून दिल आहे. जो थांबला तो संपला अस म्हणतात. पण आपण जर थांबलोच नाही तर कळेल कस की आपण दोघे अशी धुमासार स्पर्धा करत आहे एकमेकांशी.

वेळेला मागे टाकून हरवायच स्वप्न तर मी सोडूनच दिल आहे. दिवस उजाडला की पळता पळताच मी ठरवते की आज काय काय गाठायच आहे. मग ह्या धावपळीत कुठल्यातरी मुक्कामास नुसता खो देऊन पुढे पळत सुटायच आणि काही ठिकाणी धावता धावताच जरा घुटमळायच.

दिवसभराच पळण कमी होत बहुदा. म्हणूनच झोपेत माझ मन धावत सुटत. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या लोकांना भेट देऊन येत. कधी मन थकून शरिराबरोबर जरा विश्रांती घेत तेव्हा मेंदु धाव घेतो. स्वप्नातच आजकाल लेख लिहितो, कविता करतो, दुसरया दिवशीचा बेत व वेग ठरवतो.

वेळ धावत राहतो पण कधीकधी मीच थांबते; दमले नसले तरीसुध्दा. आयुष्यात घडणारया गोष्टींना जडलेल्या भावना मनात झिरपवायला; त्यांच नुसत ’असणं’ जाणवायला !

किल्ल्या

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,


बाहेरुन घरात आल्यावर लॉक लावुन मी किल्ल्या भिरकावून लावते. मग परत बाहेर जायच्या वेळी मला तयार व्हायला ५ मिनिट आणि घराच्या किल्ल्या शोधायला १० मिनिट लागतात. या धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात आपण आठवणींच्या बाबतीतसुध्दा असच करतो. मनात निरनिराळे कप्पे करतो त्यात निरनिराळे अनुभव, अनुभुती, भावना, आठवणी नकळत भरत राहतो.

आपल्या यांत्रिक जीवनात मग आपण ह्या कप्प्यांना घट्ट कुलुप घालुन धुळ खात पडु देतो. निवांत विचार करत बसलो आहोत आणि त्यातुनच मनाचा एक एक कप्पा उघडत जातो आहे आणि आठवणी ताज्या होत आहेत अस फार कमी वेळेला होत. आयुष्य अगदीच यांत्रिक राहु नये म्हणुन आपल्या नकळतच आपल्या मनाने त्याच्या कप्प्यांच्या किल्ल्या कुठेकुठे पेरुन ठेवल्या असतात ज्या हलकेच आपल्याला भुतकाळात घेउन जातात. त्याची अनुभुती तुम्हालाही झाली असेल.

कुठुनशी अलगद हवेची झुळुक येते आणि एका कप्प्याला उघडुन जाते. मग मन उडुन जात, पुर्वीसुध्दा अश्याच आलेल्या हवेच्या झुळुकेभोवती उडु लागत. मनाने त्याच्या काही किल्ल्या वासांमधे लपवल्या असतात. मग पावसानंतर येणारा मातीचा सुगंध कुठेतरी दुर, तुमच्या गावातल्या रानात तुम्हालाही घेऊन जात असेल. स्पर्शामधेसुध्दा एक किल्ली लपलेली असते. आईच्या जुन्या साडीच्या चौघडीचा स्पर्श झाला की ती पुन्हा तिच्या कुशीत नेऊन सोडते.

काही वेळा अशी एखाद किल्ली आवाजांमधे असते. जस समुद्राचा खळखळणारा नुसता आवाज ऐकला की आपण कोकणातल्या, गोव्यातल्या (किंवा तुम्ही कदाचीत हवाईच्या) समुद्रकिनारयावर जाऊन पडता आणि त्या खारया पाण्यात मनसोक्त डुंबु लागता. कधी कुठुनस गाण ऐकु येत आणि आपण कॉलेजच्या सहलीबरोबर काळोख्या रात्री लावलेल्या शेकोटीभवती तेच गाण म्हणत नाचतांना सापडतो.

कधी कधी किल्ली नावांत असते, मग त्यातल एखाद नाव ऐकल; वाचल की ती भराभर कुलुप उघडुन आठवणींना बाहेर काढते. सुखाच्या, दुःखाच्या, अवहेलना, अपमानाच्या तर कधी मैत्रीच्या. कधीकधी कुठल्यातरी नावाकडे ’मास्टर की’ असते. मग ते नाव ह्या सर्वच आठवणींना उचंबळुन बाहेर खेचत.

आणि अशातच पुन्हा अस्तित्त्वाची जाणीव होते आणि आपण सैरावैरा पळणारया मनाला पकडतो, विखुरलेल्या आठवणींना गोळा करतो. परत त्यांना कप्प्यांमधे भरुन किल्ल्या भिरकावून लावतो!

महाभारत

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,




जर तुम्ही महाभारताच्या काळात जन्मलेला होता (म्हणजे बी. आर. चोप्राच्या) तर तुम्हाला पण आठवेल की दुरदर्शन वर महाभारत चालु झाल की रस्त्यावर सामसुम व्हायची. घरी टी.व्ही. नसलेले लोक टी. व्ही. च्या दुकानासमोर गर्दी करायचे. रामायण, महाभारताच्या काळातच सर्वात जास्त टी.व्हींचा खप झाला असावा. घरातली सर्व मंडळी हातातली काम सोडुन टीव्हीला चिकटुन बसायची. रविवार सकाळी उठल्यापासुन वाट बघण सुरु व्हायच ते अथ श्री महाभारत कथा अस गाण चालु झाल की मग जीव भांड्यात पडायचा. दुरदर्शनच्या महाभारताच्या वेळी मी खुपच लहान होते, तेव्हा मी फक्त बाणांचे युध्ध वगैरे गोष्टी एंजॉय करायचे.

मी आठवी नववीत असतांना पुन्हा महाभारत केबलवर बघायचा योग आला आणि तेव्हा मी त्यातील नाट्य खरोखरच समजु शकले. पुढे कॉलेजला असतांना लायब्ररीमधुन महाभारताचा पहिला खंड वाचायला आणला पण आमच्या मातोश्रींने ’घरात महाभारत वाचल की ते घरातसुध्दा घडत’ अस म्हणुन ते परत करायला लावल. तेव्हा ’शनिवारी नख नाही कापायचीत, रविवारी केस नाही धुवायचेत, जीन्स घालायची नाही, संध्याकाळी ७ च्या आत घरात हव’ अश्या काही किरकोळ आणि काहि महत्त्वाच्या विषयांवर लढा देण्यात मी माझी सर्व शक्ती वापरत होते. त्यामुळे महाभारतावरुन महाभारत न करता मी ते परत करुन माझी तेव्हाची आवडती लेखिका कुमुदिनी रांगणेकर ची पुस्तक आणलीत.

व्यासपर्व - दुर्गा भागवत
इतक्यात दुर्गा भागवतच व्यासपर्व वाचल. वाचण्याआधी थोड कचरत चालु केल कारण महाभारत खर घडल असेल तर ते घडुन १०,००० वर्ष होउन गेलीत आता कोणती व्यक्ती कशी होती, कोणाच कुठे चुकल वगैरे विचार करण्यापेक्षा फक्त त्यातील नाट्याचा आनंद उठवायचा. पुस्तक वाचायला सुरु केल्यावर मात्र सोडावल नाही, इन फॅक्ट संपल्यावर अस वाटल हे अजुन थोड मोठ हव होत. पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल ह्यात यत्किंचीतही संशय नाही. महाभारत लहानपणापासुनच भारतीयांच्या नसानसात भिनल आहे. त्यातील साफल्य, वैफल्य, औदासिन्य, कर्ममयता, वेग-आवेग, तत्त्वद्यान, सौदर्य, उदारता, कारुण्य, द्वेष, क्वचित कामुकता, शोकक्रंदन, क्रौर्य, वीर्य, धैर्य ह्या सर्वांचे आपण चाहते आहोतच. लेखिकेने हे पुस्तक महाभारतातील उन्मत्त, गर्विष्ठ, नम्र, विरक्त, उदार इत्यादी अर्क पात्रांवर रचल आहे. व्यासाच्या जगावेगळ्या लिखाणशैलीचे तिने वर्णन केले आहे. लेखिकेची मराठी खुपच अलंकारीक आहे ती समजायला मला थोडा त्रास झाला. पण ऍट द सेम टाइम मराठी भाषेच सौदर्य जाणवल.

पुस्तक वाचुन बघा, मग तुम्ही पण म्हणाल ’हे अजुन थोड मोठ हव होत’.

ह्र्दयस्थ - डॉ. अल्का मांडके

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,


ह्र्दयस्थ ही कहाणी आहे मुंबईत मराठी माणसाच पहिल cardiac hospital उभारण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या आणि ते स्वप्न पुर्ण करणाऱ्या स्वर्गीय डॉ. नित्यनाथ (नितु) मांडकेंची. हे पुस्तक त्यांच्या बायकोने लिहिले आहे ज्या स्वतः अनस्थेटीक सर्जन आहेत. अल्काने हे पुस्तक कमालीच मनमोकळेपणाने लिहिल आहे.

मला रागीट, sarcastic, ज्यांना लोकांच्या दिसण्यापासुन असण्यापर्यंत काहीतरी comment असते, ज्यांच्या दुर्बिणीखाली लोक head to toe असतात, ज्यांचे विनोद निखळ व situational नसुन कोणत्या तरी व्यक्तिला target करुन केले असतात अश्यांची सोबत आवडत नाही. अश्यांबरोबर मला फार conscious व्हायला होत, I can not be myself. डॉ. नितु वरीलपैकी सर्व काही होते. ह्या पुस्तकातील पात्र अशी काही रंगली आहेत की जणू ती तुम्ही नुसती वाचत नसून तुमच्या सहवासात आहेत. त्यामुळे साहजिकच मला डॉ. नितु जागोजागी खटकत होते. ते एक ideal पती किंवा पिता नाहीत अस पदोपदी जाणवत होत. त्याउलट अल्का मांडकेंच सहनशील, समंजस, विचारी nature मला खुप भावल.

हे सर्व असुन देखिल डॉ. नितुंचा सहवास मला सोडवत नव्हता. त्यांची प्रचंड हुशारी, करारी, मिश्कील स्वभाव, भारदस्त व्यक्तिमत्त्व मला हळुहळु भुरळ घालत गेल. त्यांच्याबद्द्ल काहीतरी mystical अस होत जे मला अजुन पुढे वाचत राहण्यास मजबुर करत होत. आयुष्यात खुप जास्त successful होणारी लोक कदाचित aggressive असतातच. Aggression हा success चा एक ingredient च नाहीये का?

डॉ. नितुंच्या धडाडी, हुशारीमुळे व डॉ. अल्कांनी दिलेल्या साथीमुळे भारतास त्यांच्यासारखा उत्क्रुष्ट ह्र्दय सर्जन मिळु शकला.
पुस्तक क्वचीत ठिकाणी डॉ. नितुंबद्दल नसुन लेखिकेची personal diary आहे अस वाटत, जस की ते लोक कोणाकडे जेवायला गेलेत मग त्यांच्यात काय संवाद झाला वगैरे तिने नमुद केले आहे. ह्या काही गोष्टी कंटाळवाण्या होत नसल्या तरी त्या related वाटल्या नाहीत. डॉ. नितुंची बुध्दिमत्ता, ध्येयवादी व्रुत्ती, ते पुर्ण करण्याकरता त्यांनी केलेल प्रचंड hard work हे सर्व मला motivate करुन गेल. डॉ. नितुंना गरिबांबद्दल वाटणारी हळहळ, त्यांनी असंख्य लोकांना केलेली असंख्य तह्रेची मदत, त्यांची प्रचंड talented personality ह्यांनी मला कळत नकळत त्यांच्या प्रेमात पाडल. हे पुस्तक वाचुन बघा ते तुम्हालाही प्रेमात पाडतील.

भारतात अजुन असे अनेक नितु मांडके होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रंगपंचमी - व.पु. काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



कस कोणी इतक प्रतिभाशाली असु शकत, कस कोणी एवढ सुंदर लिहु शकत. आपल्या लिखाणातून लोकांना हसवत, रडवत, चिड आणत तर कधी जीव भांड्यात टाकत. कस कोणी त्यांच्या लेखांमधून वाचकांना डोळ्याची पापणी बंद न करता वाचावयास भाग पाडत. वाचकांना स्वतःच्या भाषाशैलीत भिजवत, मोहक विचारांनी रंगवत, आपल्या दिलखुलास गोष्टींमधून ओलचिंब करत.

एकाच रंगाच्या जश्या अनेक छटा असतात तश्या लिखाणाच्या विषयांच्या अनेक छ्टा असलेल्या माझ्या प्रिय स्व.व.पु. काळेंना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या लिखाणावर प्रेम बसुन त्यांची नित्सिम भक्त होण्यास त्यांच एकच पुस्तक पुरेस होत. वपुंच्या भक्तांकरता ती पोथीच आहे. पुस्तकाच नाव आहे - वपुर्झा.

जगातले सर्वच अनुभव स्वतःने घेणे अशक्य आहे. लोकांच्या अनुभवांबद्द्ल वाचून आपल्याला एक निराळच आयुष्य जगता येत. निरनिराळ्या लोकांच्या सुख, दुःख, त्याग, राग, मोह, इर्षा, यश, अपयश, चिकाटी आणि काहि जगावेगळ्या अनुभुतींमधून वेगवेगळ्या पैलुंची प्रचिती होते.अर्थात तुम्ही काय वाचता ह्यालासुध्दा महत्त्व आहे. कधी कधी पुस्तक तुम्हाला भारावून टाकतात तर कधी ती तुमचे त्यक्तिमत्त्व व विचार बदलण्यास कारक ठरतात. त्यामुळे योग्य पुस्तक वाचण हे आपल्याच हातात असत.

इतक्यात ’रंगपंचमी’ नावाच वपुंच पुस्तक वाचल. नावाप्रमाणेच हे तुम्हाला भिजवून, रंगून टाकेल.

रंगपंचमी ही त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे आणि विविध रंगांच्या उधळणीमुळे साजरी होते.
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगळीवेगळी माणसे आपल्याला सामील होतात. हे पुस्तक वपुंच्या आयुष्यात आलेल्या माणसांवर आहे, ज्यांनी त्यांना बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला हातभार लावला. त्यातील प्रत्येक माणसाचे रंग निराळे, कधी शहाणपणाचे, कधी वेडेपणाचे, उत्साहाचे तर कधी नैराश्याचे. वपुंची छोट्या छोट्या प्रसंगांनी रंगलेली ही रंगपंचमी तुम्ही नक्कीच एंजॉय कराल.

सूर्या रे प्राण हा तळमळला...

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,



सकाळ पेपर मधे माझा आर्टिकल छापून आला तो इथे कॉपी पेस्ट करत आहे:

सूर्या रे प्राण हा तळमळला...

सिऍट्ल - मायक्रोसॉफ्ट च माहेरघर आणि तसच संपुर्ण अमेरिकेत सर्वाधिक खप असलेल्या स्टारबकस कॉफीच माहेरघर. चहु बाजुंनी डोंगरांनी आच्छादलेल्या ह्या गावाला पाचुसारखे हिरवेगार शहर म्हणतात. अमेरिकेतील टक्केवारीनुसार सर्वाधिक सुशिक्षित आणि सर्वाधिक सुद्रुढ लोकांच गाव. संपुर्ण अमेरिकेत सिऍट्ल मधला कॉफीचा खप आणि लोकांच्या आत्महत्यांचा रेट सर्वात अधिक. मला वाटत त्याच कारण - इथल हवामान. दहा महिने फक्त पाऊस,थंडी आणि काळे ढग म्हणून उर्जा मिळ्वायला लोक न चुकता व्यायाम करतात, कॉफी पितात, किंवा नैराश्य येऊन जीव देतात. इथल्या सूर्यदर्शनाच वर्णन मी अस करीन:

क्षणभर डोळे मी मिटले
होते त्यांना सूर्यकिरणांनी दिपले
उघडुन त्यांस पुन्हा रविस बघितले
तर होते त्याला काळ्या ढगांनी घेरले

सतत पावसाचा वर्षाव होणाऱ्या सिऍट्ल मधे चक्क तळपतं ऊन पडलय. कालपर्यंत थंडी आणि पाऊस असतांना आज अचानक ऊन! निसर्ग रंग बदलतो, सिऍट्ल मधे तर तो सरड्यासारखा वागतो. कधी पाऊस, कधी थंडी, कधी स्नो, ऊन्हाच दर्शन मात्र फार कमी वेळा देतो. सूर्य बघायला इथे डोळे आसुसतात, सतत दोन-दोन लेयर्स मधे गुरफटलेल शरिर मोकळा श्वास घ्यायला तडफडत. तळपत्या ऊन्हात समुद्रावर जाऊन गार वारा खायला माझा जीव कासावीस होतो.

संपूर्ण जगाला उर्जा देणारा दाता प्रसन्नला
काळ्या ढगांवर प्रहार करुन अखेर त्याने विजयश्री मिळविला

चटके बसणार ऊन असुनही मी गच्चीत बसून त्याचा मारा व्रूक्षाच्या सावलीत बसल्याप्रमाणे सहन करते आहे. माझ्या मागे उभी स्पेस नीडल ऊन्हात लख्ख चकाकत अजुनच सुंदर भासतेय. समोर दिसणाऱ्या निळ्याक्षार समुद्र्यावरुन सूर्याच प्रखर प्रतिबिंब माझ्या डोळ्यात जातय आणी चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो तशी सूर्याच्या दर्शनाची वाट बघणारे माझे डोळे त्याला चांदण्याप्रमाणे झेलत आहेत. छोट्या, मोठ्या, रंगीबेरंगी बोटी संथपणे ऊन खात जा ये करत आहेत. माझ्या डाव्या बाजु्च्या डाऊनटाऊन मधल्या आकाशाला भेदू पाहणाऱ्या इमारती सनबाथ घेत ऐटीत पसरल्या आहेत आणि त्याच्या कडेला निम्मा बर्फ वितळून गेल्याने भकास भासणारा माउंट रेनीअर स्वत:च्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत आहे. वस्तु न वस्तु उजळून निघाली आहे.

निसर्ग निराळ रुप सजवणार
दोन महिने आता सूर्यकिरण बरसवणार
सिऍट्लला धरतीवरील स्वर्ग भासवणार
आपले सौदर्य लोकांच्या मनात भिनवणार


-रसिका महाबळ

फॉर हीअर ऑर टु गो - अपर्णा वेलणकर

Author: Rasika Mahabal / Labels: , ,

अपर्णाने अर्धशतकापुर्वि अमेरिकेत आलेल्या मराठी माणसांच्या आयुष्यावर हे पुस्तक लिहिल आहे. लेखिकेने पुस्तकाचा फ़्लो कमालीचा सुंदर ठेवला आहे. तिने विविध चॅप्टरस मधुन अमेरिकेतील मराठी माणसाच्या आयुष्यातले सर्वेच पैलु कव्हर केले आहेत. लेखिकेने पुस्तकात खालील विषयांवर कहाण्या लिहिल्या आहेत:

१. मराठी माणस इथे का व कधी येउ लागलीत
२. त्यांना इथे येण्याकरता आणी इथे आल्यावर सहन करावे लागलेले त्रास
३. इथे धड्पड करुन धंदा/ जॉब मध्ये प्रचंड यश मिळालेंच्या आणि धडपड करुन सुध्दा हाती निराशा आलेल्यांच्या कहाण्या
४. इथे आलेल्या मुलांची भारतातल्या मुलिंबरोबरची लग्न आणी कधी त्यातुन झालेली फसवणुक
५. मिश्र विवाह - भारतीयांने निवडलेले अमेरिकन साथिदार
६. इथे येउन अमेरिकनाइझ्ड झालेले काही तर काही मराठी संस्क्रूती उगाळत बसलेले आणी काहि दोन्हिंमधिल मध्य साधण्याच्या झटापटीत गुंतलेले.
७. इथे पर्फॉम करायला येणारया कलावंतांच्या चांगल्या - वाईट वागणुकीचे कीस्से
८. अमेरिकेत निघालेल्या मराठी व्रुत्तपत्र, पुस्तक, मॅगझिनस आणी महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेचा इतिहास
९. अमेरिका व भारत ह्या दोन्हि देशात राहण्याचे फायदे व गैरफायदे
१०. एबीसीडीज ची व्यथा
११. अमेरिकेत येणारे सासु- सासरे/ आई- वडिल - काही सारखे कंटाळलेले तर काही एकदम उत्साही
१२. इथे लग्न करुन येणारया पण जॉब न करणारया मुलींची गोष्ट
१३. काही इथे राहण्याचा निर्णय घेतलेल्यांच्या, काही परत गेलेल्यांच्या, तर काही अजुनही 'पुढल्या वर्षी परत जाऊ' असे बेत आखणारयांच्या
१४. महाराष्ट्र मंडळाच्या चांगल्या वाईट बाजुंच्या
१५. इथे आयुष्यभर राहुन इथेच निव्रुत्तीचे आयुष्य घालवणारयांच्या

लेखिकेने आनंदीवाई जोशींपासुन, येथील ग्रोसरि प्रॉब्लम ते देशापासुन-आपल्यांपासुन दुर राहण्यामुळे होणारा मानसिक त्रास नमुद केले आहेत. सर्व गोष्टी लेखीकेने इथे आलेल्या पिढीचा अभ्यास करुन स्वत:च्या ऑबझर्व्हेशनस वर आणी त्या पिढीतिल लोकांच्या मुलाखतींवर बेस्ड ठेवल्या आहेत.

मला हे पुस्तक खुपच आवडले, तुम्हालाही नक्कीच आवडेल अस कॉंफीडंट्ली सांगते...