जो थांबला तो संपला

Author: Rasika Mahabal / Labels: ,



वेळ सुसाट पळत सुटला आहे. त्याला मुठीत धरण्याचा नाहक प्रयत्न मी सोडून दिला आहे. वेळेबरोबर मी सुध्दा पळत आहे, अगदी जीव मुठीत घेऊन.

कधीकधी नुसतच क्षणभर थांबून बघते की तो किती जोरात पळत आहे आणि आत्तापर्यंत किती जोरात पळत आला आहे. तो दमत कसा नाही? जरा सावकाश का जात नाही? त्याला जरा दमाने घे अस सांगण मी सोडून दिल आहे. जो थांबला तो संपला अस म्हणतात. पण आपण जर थांबलोच नाही तर कळेल कस की आपण दोघे अशी धुमासार स्पर्धा करत आहे एकमेकांशी.

वेळेला मागे टाकून हरवायच स्वप्न तर मी सोडूनच दिल आहे. दिवस उजाडला की पळता पळताच मी ठरवते की आज काय काय गाठायच आहे. मग ह्या धावपळीत कुठल्यातरी मुक्कामास नुसता खो देऊन पुढे पळत सुटायच आणि काही ठिकाणी धावता धावताच जरा घुटमळायच.

दिवसभराच पळण कमी होत बहुदा. म्हणूनच झोपेत माझ मन धावत सुटत. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या लोकांना भेट देऊन येत. कधी मन थकून शरिराबरोबर जरा विश्रांती घेत तेव्हा मेंदु धाव घेतो. स्वप्नातच आजकाल लेख लिहितो, कविता करतो, दुसरया दिवशीचा बेत व वेग ठरवतो.

वेळ धावत राहतो पण कधीकधी मीच थांबते; दमले नसले तरीसुध्दा. आयुष्यात घडणारया गोष्टींना जडलेल्या भावना मनात झिरपवायला; त्यांच नुसत ’असणं’ जाणवायला !

किल्ल्या

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,


बाहेरुन घरात आल्यावर लॉक लावुन मी किल्ल्या भिरकावून लावते. मग परत बाहेर जायच्या वेळी मला तयार व्हायला ५ मिनिट आणि घराच्या किल्ल्या शोधायला १० मिनिट लागतात. या धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात आपण आठवणींच्या बाबतीतसुध्दा असच करतो. मनात निरनिराळे कप्पे करतो त्यात निरनिराळे अनुभव, अनुभुती, भावना, आठवणी नकळत भरत राहतो.

आपल्या यांत्रिक जीवनात मग आपण ह्या कप्प्यांना घट्ट कुलुप घालुन धुळ खात पडु देतो. निवांत विचार करत बसलो आहोत आणि त्यातुनच मनाचा एक एक कप्पा उघडत जातो आहे आणि आठवणी ताज्या होत आहेत अस फार कमी वेळेला होत. आयुष्य अगदीच यांत्रिक राहु नये म्हणुन आपल्या नकळतच आपल्या मनाने त्याच्या कप्प्यांच्या किल्ल्या कुठेकुठे पेरुन ठेवल्या असतात ज्या हलकेच आपल्याला भुतकाळात घेउन जातात. त्याची अनुभुती तुम्हालाही झाली असेल.

कुठुनशी अलगद हवेची झुळुक येते आणि एका कप्प्याला उघडुन जाते. मग मन उडुन जात, पुर्वीसुध्दा अश्याच आलेल्या हवेच्या झुळुकेभोवती उडु लागत. मनाने त्याच्या काही किल्ल्या वासांमधे लपवल्या असतात. मग पावसानंतर येणारा मातीचा सुगंध कुठेतरी दुर, तुमच्या गावातल्या रानात तुम्हालाही घेऊन जात असेल. स्पर्शामधेसुध्दा एक किल्ली लपलेली असते. आईच्या जुन्या साडीच्या चौघडीचा स्पर्श झाला की ती पुन्हा तिच्या कुशीत नेऊन सोडते.

काही वेळा अशी एखाद किल्ली आवाजांमधे असते. जस समुद्राचा खळखळणारा नुसता आवाज ऐकला की आपण कोकणातल्या, गोव्यातल्या (किंवा तुम्ही कदाचीत हवाईच्या) समुद्रकिनारयावर जाऊन पडता आणि त्या खारया पाण्यात मनसोक्त डुंबु लागता. कधी कुठुनस गाण ऐकु येत आणि आपण कॉलेजच्या सहलीबरोबर काळोख्या रात्री लावलेल्या शेकोटीभवती तेच गाण म्हणत नाचतांना सापडतो.

कधी कधी किल्ली नावांत असते, मग त्यातल एखाद नाव ऐकल; वाचल की ती भराभर कुलुप उघडुन आठवणींना बाहेर काढते. सुखाच्या, दुःखाच्या, अवहेलना, अपमानाच्या तर कधी मैत्रीच्या. कधीकधी कुठल्यातरी नावाकडे ’मास्टर की’ असते. मग ते नाव ह्या सर्वच आठवणींना उचंबळुन बाहेर खेचत.

आणि अशातच पुन्हा अस्तित्त्वाची जाणीव होते आणि आपण सैरावैरा पळणारया मनाला पकडतो, विखुरलेल्या आठवणींना गोळा करतो. परत त्यांना कप्प्यांमधे भरुन किल्ल्या भिरकावून लावतो!

महाभारत

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,




जर तुम्ही महाभारताच्या काळात जन्मलेला होता (म्हणजे बी. आर. चोप्राच्या) तर तुम्हाला पण आठवेल की दुरदर्शन वर महाभारत चालु झाल की रस्त्यावर सामसुम व्हायची. घरी टी.व्ही. नसलेले लोक टी. व्ही. च्या दुकानासमोर गर्दी करायचे. रामायण, महाभारताच्या काळातच सर्वात जास्त टी.व्हींचा खप झाला असावा. घरातली सर्व मंडळी हातातली काम सोडुन टीव्हीला चिकटुन बसायची. रविवार सकाळी उठल्यापासुन वाट बघण सुरु व्हायच ते अथ श्री महाभारत कथा अस गाण चालु झाल की मग जीव भांड्यात पडायचा. दुरदर्शनच्या महाभारताच्या वेळी मी खुपच लहान होते, तेव्हा मी फक्त बाणांचे युध्ध वगैरे गोष्टी एंजॉय करायचे.

मी आठवी नववीत असतांना पुन्हा महाभारत केबलवर बघायचा योग आला आणि तेव्हा मी त्यातील नाट्य खरोखरच समजु शकले. पुढे कॉलेजला असतांना लायब्ररीमधुन महाभारताचा पहिला खंड वाचायला आणला पण आमच्या मातोश्रींने ’घरात महाभारत वाचल की ते घरातसुध्दा घडत’ अस म्हणुन ते परत करायला लावल. तेव्हा ’शनिवारी नख नाही कापायचीत, रविवारी केस नाही धुवायचेत, जीन्स घालायची नाही, संध्याकाळी ७ च्या आत घरात हव’ अश्या काही किरकोळ आणि काहि महत्त्वाच्या विषयांवर लढा देण्यात मी माझी सर्व शक्ती वापरत होते. त्यामुळे महाभारतावरुन महाभारत न करता मी ते परत करुन माझी तेव्हाची आवडती लेखिका कुमुदिनी रांगणेकर ची पुस्तक आणलीत.

व्यासपर्व - दुर्गा भागवत
इतक्यात दुर्गा भागवतच व्यासपर्व वाचल. वाचण्याआधी थोड कचरत चालु केल कारण महाभारत खर घडल असेल तर ते घडुन १०,००० वर्ष होउन गेलीत आता कोणती व्यक्ती कशी होती, कोणाच कुठे चुकल वगैरे विचार करण्यापेक्षा फक्त त्यातील नाट्याचा आनंद उठवायचा. पुस्तक वाचायला सुरु केल्यावर मात्र सोडावल नाही, इन फॅक्ट संपल्यावर अस वाटल हे अजुन थोड मोठ हव होत. पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल ह्यात यत्किंचीतही संशय नाही. महाभारत लहानपणापासुनच भारतीयांच्या नसानसात भिनल आहे. त्यातील साफल्य, वैफल्य, औदासिन्य, कर्ममयता, वेग-आवेग, तत्त्वद्यान, सौदर्य, उदारता, कारुण्य, द्वेष, क्वचित कामुकता, शोकक्रंदन, क्रौर्य, वीर्य, धैर्य ह्या सर्वांचे आपण चाहते आहोतच. लेखिकेने हे पुस्तक महाभारतातील उन्मत्त, गर्विष्ठ, नम्र, विरक्त, उदार इत्यादी अर्क पात्रांवर रचल आहे. व्यासाच्या जगावेगळ्या लिखाणशैलीचे तिने वर्णन केले आहे. लेखिकेची मराठी खुपच अलंकारीक आहे ती समजायला मला थोडा त्रास झाला. पण ऍट द सेम टाइम मराठी भाषेच सौदर्य जाणवल.

पुस्तक वाचुन बघा, मग तुम्ही पण म्हणाल ’हे अजुन थोड मोठ हव होत’.