तो

Author: Rasika Mahabal /रात्री अंथरुणावर पडेपर्यंत सोबत होता, वाचत राहिले तितका वेळ आजूबाजूला घुटमळला.

झोपले तेव्हा दिवसभरात कमावलेल सगळ काही घेऊन गेला. आज मी कफल्लक.
समोर नविन दिवस उभा पण ह्या अफाट विश्वात त्याला कुठे शोधू जो काल मावळला?

शापित

Author: Rasika Mahabal / Labels:


मधे ल. त्र्यं. जोश्यांनी लिहिलेला पेपरमधील त्याच्याबद्द्लचा लेख वाचला व त्याची आठवण झाली. त्याची फार सुंदर छबी जोश्यांनी मांडली, अगदी तसाच होता तो!

एकदम उगवायचा, मी रहायालाच आलो आहे सांगायचा. आल्या आल्या भूक लागली जाहीर करुन शिळ्या पोळीत खुष असायचा.

येतांना माझ्याकरता स्वत:ने रंगवलेल चित्र, काड्यांनी बनवलेली हातगाडी अस काही हमखास आणायचा. बाजूला बसवुन मला रंगकाम, crafts शिकवायचा. आता रिकामे डब्बे, कागद, काड्या ह्यांच्या वस्तू बनवल्या, कुठलही चित्र काढल की त्याच स्मरण होत. त्याने दिलेली भेट आयुष्याला विलोभनीय बनवणारे छंद देउन गेली.

शिक्षणाने व व्यवसायाने फ्रीलांस पत्रकार व उत्तम कार्टूनिस्ट अगदी लक्ष्मणच्या पातळीवरचा. बोलण्यात त्याच्या चातुर्य होत. सर्व मामले खुल्लमखुल्ला सडेतोड बोलणे लिहिणे असुनही महाराष्ट्रातील पत्रकार, संपादक, मंत्री ह्यांच्यासोबत त्याची खूप जवळिक होती. ह्या ओळखींमधून तो गरजूंची मदत करायचा. दांडग वाचन, कुठल्याही विषयावरील त्याच द्यान वाखाणण्याजोग होत. त्याच्याच आयुष्यावर सिंहासन चित्रपटातील निळू फुलेच पात्र उभारल अस मला वाटे.


त्याला आयुष्यात काहीच कमवायच नव्हत व गमवण्यासारख त्याच्याकडे काहीच नव्हत, ना घर ना दार ना पैसा ना कोणी हितचिंतक. कुठल्याही भावंडांच्या लग्नाकार्यातून पळापळीची काम करायचा, तळपणारया उर्जेच ते केंद्र होत, कधी मरगळलेल त्याच अवसान मी बघितलच नाही. लोकांकरता काही करण्यामागे त्याची कसलीच अपेक्षा नसायची तरीदेखिल त्याच्या भाळी फक्त उपेक्षाच आली. 

स्वभावाने तो कलंदर होता, एका ठिकाणी फार काळ टिकू न शकणे हे त्याच वैशिष्ट. मळके कपडे, पायात चपला कधीच नसायच्या, तोंडात सतत बीडी, आंघोळ करण्याचा कंटाळा, खिशात फार तर फार ५ रुपये. ट्रेनने बिनतिकिट प्रवास करायचा. त्याच्याकडे बघून वाटायच इतक्या हुशार माणसान आपल्या हुशारीचा फायदा करुन न घेता अस फकीर का जगाव? त्याला सगेसोयरे वेडा म्हणत पण तो वेडा नव्हता. त्याला वेडा म्हणणारयांहून चारपट हुशार होता, कदाचित अतिहुशारी हाच त्याचा दोष होता. त्याकाळी समाजामधून समजून न घेतल्या जाणारया कलाकारांचा तो प्रतिक होता.

ना कधी त्याने कोणाच वाइट केल ना चिंतल. काळाने, नशिबाने का त्याने स्वत:नेच ही त्यावर वेळ आणली? त्याने अस का केल? त्याला कोणी मार्गदशन का नाही केल? त्याच्या व्यसनांमधून त्याला कोणी मुक्त का नाही करवल? नानाविध प्रश्न आता मनात घोळतात.  विलक्षण जगला तसाच त्याचा अंत देखिल विलक्षण झाला. एका अपघातात तो पाय गमावून बसला. त्यानंतर काही वर्षांनी अस अवलंबून जीवनाचा कंटाळा आला व त्याने अन्न पाणी त्याग केल.

जोशी म्हणतात तस  वणवण फिरणाऱ्या अश्वत्थामा सारख त्याच आयुष्य, फरक एकच - 'तो' इतरांच्या जखमांवर फ़ुंकर घालत जगला. माझ्यासारख्यांच्या आयुष्यात inspiration म्हणून त्याची धग आजवर ज्वलंत आहे.

दिलीप पिंपळखरेच्या स्मृतीस अभिवादन.

सखी

Author: Rasika Mahabal / Labels:
गप्प्पा जीवनातल्या चिमुकल्या क्षणांच्या
मनस्वी नात्यांच्या  इंद्रधनुषी गोफांच्या
पायी टोचणाऱ्या काट्यांच्या 
पदर ओढत ओरखडे देणाऱ्या निवडुंगाच्या

जाणते ती मनातले कवडसे,
रंग, रेषा, उकार, वेलांट्या
आठवणी लाडिवाळपणे भवती फिरणारया
मैत्र्या कस्तुरी दरवळणाऱ्या

तिच्यात चिवडयातल्या कढिलिंबाचा कुरकुरीतपणा, 
ओल्या नारळाचा चरबरीत गोडवा
उत्तम उदात्त सुंदर हे सख्य आहे
ती - एक सखी आहे. 
थोड वेळेआधी

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , ,


भारतातील रिती, रुढी, रिवाज, परंपरा, प्रथा ह्यांच्या नावाखाली स्त्रीयांना सतत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. उदाहरण द्यायची झालित तर भरपूर आहेत.

कुठल्याही लग्नात होणारया विधी बघितल्यात तुम्ही? पुरुष सर्व प्रकारचे विधी करतात व बाई फक्त त्याच्या हाताला हात लावून support दर्शवते. आजकालच्या जमान्यात बायका घर दार सगळ चालवतात, त्यांचा रोल कर्त्या बाईचा असतो, जे काय आयुष्यात घडत ते एक एकमेकांच्या equal मदतीने घडत त्यामूळे निम्म्या विधींमधे पुरुषांनी हाताला हात लावून बसायला हरकत नाहीये. लग्न लावुन देणारया पुरुष पूजारयांच्या ते पचनी पडायचे नाही. एखाद गोष्ट नुसती रीत आहे म्हणून follow करत बसायच कारण?

जन्मल्यावर वडिलांचे व लग्नानंतर नवरयाचे नाव लावायची अजून एक प्रथा. ह्या परंपरेच्या नावाखाली पुरुषांना पुरुषप्रधान समाज ठेवण्याची सोय मिळाली आहे. आईच नाव कुठेच का येऊ नये? शेवटी जन्म द्यायच सर्वात अवघड काम एक नारीच करते. अर्थात ह्या बदलाकरता पुरुषांचा विरोधच असणार कारण तस घडल नाही तर त्यांच्या नाहक अहंकारास ठेच पोहोचेल.

लग्न झाल्यावर मुलगी आता दुसरया घरची झाली वगैरे संवाद मला बोसट आणि मागासलेले वाटतात. मुलीच एक घर असत व मुलाच एक. कोणी कोणाच्या घरी न जाता दोघांच मिळून एक घर बनवायच असत. आईवडिलांसोबत वर्षानूवर्षां पासूनचे धागे दोरे तोडुन मुली बाहेर पडतात, पुरुषांची मात्र साधी नाळ सुध्धा तुटू नये? एकमेकांच्या आई वडिलांची गरजेनुसार सेवाशुश्रुषा करावी. फक्त मुलगा असेल तरच म्हातारपणाची काठी बनतो हे disprove केल्याशिवाय मुलगी झाली म्हणून तिचा निर्घुण बळी दिला जाणार नाही.

बायांनो तुम्ही married असाल तर मंगळसुत्री, टिकल्या, जोडवी घाला, आम्ही मात्र बोंगाडे फिरतो. ह्या प्रथा झिडकवणारया बायकांची छीथू करण अर्थातच पुरुषांच्या फायद्याच आहे पण बायकांकडूनही त्यांचा धिक्कार होतो तेव्हा मला त्यांची कीव करावीशी वाटते. अश्या बायका कदाचित बाई म्हणून जन्मण हे स्वलांछ्न, कमीपणाच व बांधीलकीच काम समजतात. 

एक एक दोन दोन वर्षांनी भारताबाहेर राहणारी जोडपी स्वकीयांसोबत वेळ घालवायला मायदेशी जातात. त्यात पुरुष सगळे दिवस स्वतःच्या घरी राहतात व मुलिंकडून ही अपेक्षा ठेवली जाते की त्या अर्धा अर्धा वेळ दोनीही घरी घालावतील. अशी बळजबरी करण्याच कारण? तुमच्या सारख्या त्याही त्यांच्या कुटूंबियांना भेटण्याकरता, त्यांच्यासोबत वेळ घालवण्याकरता व्याकूळ आहेत. त्यांनी त्यांच्या ईच्छांना ठेचून, स्वतःच मन मारुन का जगाव?

बायकांना त्यांनी दिलेल बलिदान, त्यांची ममता, सहनशीलता अशी काही अवजड विशेषण लावून मग घाऊक पुजल जात, ओळखल जात, एक स्त्री म्हणून जन्मदात्यांकडून ते जडवल; घडवल जात. ह्या सर्वात त्यासूध्धा तुमच्यासारख्याच एक भावनाप्रधान मानव आहेत हे का विसरल जात?  एक पुरुष व बाई समाजातील स्वतंत्र्य व समर्थ घटक आहेत, त्यांना पदोपदी क्षणोक्षणी equal treatment मिळालीच पाहीजे व त्याकरता कोणीही स्वतःच्या साध्या भावनांचा बळी द्यायची गरज नाहीये.


समाजात घडणारया अनेक निर्दयी घटनांच कथन करायच राहिल ते पून्हा कधी करेन. तोवर तुम्ही मी म्हणते त्यावर शांत डोक्याने विचार करुन बघा ते नाही जमल तर तुमच्या शिव्यांची लाखोली comment मधे वहा. ती मी आनंदाने accept करेन. Revolution तर लवकरच घडणार आहे पण कदाचीत मी थोड वेळेआधी लिहीते आहे. कुठलीही inspiration वेळेआधी rebellious च वाटते.

. एक होता पाऊस .

Author: Rasika Mahabal / Labels: ,


आपल्या सगळ्य़ांनाच तो आवडतो. त्याच्या बरसण्याआधी आसमंत खुलतो. हळूवार गार वाऱ्यासोबत वेली, पान, फुल मंद झुलतात. त्याच्या आगमनाकरता पक्षी किलबिलतात. थेंबथेंब तो बरसतो, ओंजळित  साठलेला तो हाताला अलगद स्पर्श करुन ओघळतो.

त्याच्या ह्या सर्व करामती मला लहान बाळाचा सहवास वाटतात. बाळाचा सुवास, त्याचा मऊसूत स्पर्श, त्याच हसर बेफिकीर अल्लड रुप सगळ कस त्या हळूवार पावसाप्रमाणे असत.

असा तो खेळकर आल्हाददायी बरसत रहातो. मग सुरु होतो विजांचा कडकडाट, त्याच रपारप कोसळण, धरतीवर विजयश्री मिळवल्याचा त्याचा हा हास्यकल्लोळ . त्याच ते उन्मत्त आक्राळविक्राळ रुपांतर! वाटत त्याचा तो गोजिरेपणा गेला कुठे?

नुकत्या यौवनात प्रवेश केलेल्या युवकाप्रमाणे त्याच हे वागणं भासत.

गरजून बरसून डोंगराच्या कडेवर तो येउन ठेपतो. समोर सुंदर देखावा, वरती भव्य निरभ्र आकाश आणि खाली खोल दरी. ह्या दैदिप्यमान नजाऱ्याने तो अवाक असतो, आता त्याला सर्व काही स्पष्ट दिसत असत. इथवर येइपर्यंत केलेल्या नासधुसीने तो खजील असतो. ह्या कड्यावरून कधीही पडणार ह्याची जाणीव झालेला तो त्याच्यासारख्या अनेकांना दरीत कोसळतांना बघतो, त्याच्या पाठिमागुन येणारेही तेच करणार असतात.

नदीस मिळाला का समुद्रास मिलीन झाला, मातीत झिरपला का मातीमोल झाला? कोणास ठाउक कारण तो असा हरवला की जणू त्याचा कधी लवलेशही नव्हता. जाण्याआधी त्याच स्वप्न मात्र पूर्ण करुन गेला, क्षणभर का होईना पण इंद्रधनुष्य सोडून गेला...

न-आस्तिक

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,

आईबाबांना मी नेहमीच पूजा पोथी पाठ करतांना पाहिल. श्लोकच्या श्लोक पोथ्याच्या पोथ्या माझ्या नुसत्या ऐकुन पाठ आहेत. दर वेळेला मंदिरात प्रवेश केला की खूप प्रसन्न वाटत. तिथला गंध, मृदंग, मंजुळ घंटानाद; मंदिर जुनं आणि पाण्यातिरी असेल तर मन अजून प्रफुल्लीत वाटत. पण तिथे आलेले भक्त बघितलेत की मला जाणवत ते रिकामपण. मूर्तीच्या रुपात भक्तांच निर्मितीकाराला बघण हाच कर्ता धर्ता असा अतूट विश्वास त्यांच्या डोळ्यात बघितला की ती धुंदी, ती दृढ श्रद्धा माझ्यात नाही ह्याचा मला खेद वाटतो. त्या नितांत भक्तीचा अनुभव घेण निश्चीतच विशेष असेल पण त्याचा माझ्यात लवलेशही नाही. आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवली म्हणून अनुभवायची अस म्हणून ती निर्माण पण  होऊ शकत नाही. त्यामुळे मला मुर्त्यांसमोर, मंदिरांमधे भयंकर आउट ऑफ प्लेस सुध्दा वाटत.

अर्थात भारतामध्ये अस विश्वास नाही म्हणून जगण सोप्प नाही. तिथल्या संस्कृतीत दुसऱ्या विचारांना जणू स्थान नाही. तुम्ही नास्तिक म्हणून वाळीत टाकले जाउ शकता किंवा हा कोण स्वत:ला शहाणा समजतो असहि म्हटल जाउ शकत. (हा पोस्ट टाक्ण्याआधीहि मी दोन वेळा विचार केला). अतिशय धार्मिक कुटूंबात जन्माला आलात तर मग संपल. एमोशनल ब्लेकमेल करून तुम्हाला मंदिरात किंवा पूजा पाठामध्ये खेचलच जाइल. देवाच असं  केल नाही तर अघटित घडत अस मनात बिंबवल जात.  भीती दाखवुन विश्वास बसायला लावण हे कितपत योग्य आहे?  पूजाअर्चेमधे  खेचलं गेल्यास खजील वाटत असत कारण मन ओसाड आणि चेहेऱ्यावर भक्ती दाखवणं मला कोणाच्यातरी विश्वासाला, पवित्र भावनेला ठेच पोचवल्या सारखं वाटत. 

ह्या जगाची निर्मिती का झाली  ह्याच ठोस उत्तर कोणाकडेच नाहीये. जे लोक ते कळाल असण्याचा दावा करतात त्यांच्याकरता वेल एंड गुड. देवाने हे सगळ निर्माण केल तर देवाला कोणी केल?, जगाची निर्मिती, ग्रहांची निर्मिती त्यावरचे जीवजंतू, माझ येथिल अस्तित्त्व, त्या अस्तित्त्वाला काही अर्थ आहे का नाही अश्या बऱ्याच गोष्टिंवर मी विचार करते त्यावर वाचन करते. त्यामुळे देवावर विश्वास नाही म्हणणारे लोक सखोल विचारी नसतात किंवा माजोरडे असतात अस काही मला वाटत नाही, ते सुद्धा सगळ्या पौसिबिलिटिज ना कंसिडर करत असतात. कदाचित देवाधर्माच्या मार्गावरुन जाऊनही आलेले असतात. निर्मिती च उत्तर पाठ्पठनामधून मिळवाव, मनन चिंतन वा वाचनातून मिळवाव. किंवा कोणी म्हणाव मला जन्म मिळाला आहे आता मी 'अबब केवढ हे सौदर्य' अस म्हणत जगणार, ना मला कुठला प्रश्न आहे ना कुठल्या उत्तराची अपेक्षा. मला ह्या जगावर ह्या निसर्गावर विश्वास आहे त्याकरता अजून कुठल्या जगावर विश्वास न ठेउन जगणं इतकस वाइट नाहीये. देवाच्या अस्तित्त्वासारख्या मेजर गोष्टिबाबत इतर लोकांवर, व मुख्यत्वे तुमच्या पोरांवर तुमचे विचार लादु नये अस वाटत. त्यांना त्यांचे विचार असण्याच व्यक्तीस्वातंत्र मिळाव,  ते एक्स्प्रेस करण्याची मुभा द्यावी,  त्यांच्या मतांना विचांरांना तेवढच शालीन व पवित्र समजावं व त्यांच्या फक्त निसर्गावर श्रद्धा ठेवण्याच्या निर्णयाला तेवढाच मान सन्मान मिळावा अशी मी आशा करते!