. एक होता पाऊस .

Author: Rasika Mahabal / Labels: ,


आपल्या सगळ्य़ांनाच तो आवडतो. त्याच्या बरसण्याआधी आसमंत खुलतो. हळूवार गार वाऱ्यासोबत वेली, पान, फुल मंद झुलतात. त्याच्या आगमनाकरता पक्षी किलबिलतात. थेंबथेंब तो बरसतो, ओंजळित  साठलेला तो हाताला अलगद स्पर्श करुन ओघळतो.

त्याच्या ह्या सर्व करामती मला लहान बाळाचा सहवास वाटतात. बाळाचा सुवास, त्याचा मऊसूत स्पर्श, त्याच हसर बेफिकीर अल्लड रुप सगळ कस त्या हळूवार पावसाप्रमाणे असत.

असा तो खेळकर आल्हाददायी बरसत रहातो. मग सुरु होतो विजांचा कडकडाट, त्याच रपारप कोसळण, धरतीवर विजयश्री मिळवल्याचा त्याचा हा हास्यकल्लोळ . त्याच ते उन्मत्त आक्राळविक्राळ रुपांतर! वाटत त्याचा तो गोजिरेपणा गेला कुठे?

नुकत्या यौवनात प्रवेश केलेल्या युवकाप्रमाणे त्याच हे वागणं भासत.

गरजून बरसून डोंगराच्या कडेवर तो येउन ठेपतो. समोर सुंदर देखावा, वरती भव्य निरभ्र आकाश आणि खाली खोल दरी. ह्या दैदिप्यमान नजाऱ्याने तो अवाक असतो, आता त्याला सर्व काही स्पष्ट दिसत असत. इथवर येइपर्यंत केलेल्या नासधुसीने तो खजील असतो. ह्या कड्यावरून कधीही पडणार ह्याची जाणीव झालेला तो त्याच्यासारख्या अनेकांना दरीत कोसळतांना बघतो, त्याच्या पाठिमागुन येणारेही तेच करणार असतात.

नदीस मिळाला का समुद्रास मिलीन झाला, मातीत झिरपला का मातीमोल झाला? कोणास ठाउक कारण तो असा हरवला की जणू त्याचा कधी लवलेशही नव्हता. जाण्याआधी त्याच स्वप्न मात्र पूर्ण करुन गेला, क्षणभर का होईना पण इंद्रधनुष्य सोडून गेला...