शापित

Author: Rasika Mahabal / Labels:


मधे ल. त्र्यं. जोश्यांनी लिहिलेला पेपरमधील त्याच्याबद्द्लचा लेख वाचला व त्याची आठवण झाली. त्याची फार सुंदर छबी जोश्यांनी मांडली, अगदी तसाच होता तो!

एकदम उगवायचा, मी रहायालाच आलो आहे सांगायचा. आल्या आल्या भूक लागली जाहीर करुन शिळ्या पोळीत खुष असायचा.

येतांना माझ्याकरता स्वत:ने रंगवलेल चित्र, काड्यांनी बनवलेली हातगाडी अस काही हमखास आणायचा. बाजूला बसवुन मला रंगकाम, crafts शिकवायचा. आता रिकामे डब्बे, कागद, काड्या ह्यांच्या वस्तू बनवल्या, कुठलही चित्र काढल की त्याच स्मरण होत. त्याने दिलेली भेट आयुष्याला विलोभनीय बनवणारे छंद देउन गेली.

शिक्षणाने व व्यवसायाने फ्रीलांस पत्रकार व उत्तम कार्टूनिस्ट अगदी लक्ष्मणच्या पातळीवरचा. बोलण्यात त्याच्या चातुर्य होत. सर्व मामले खुल्लमखुल्ला सडेतोड बोलणे लिहिणे असुनही महाराष्ट्रातील पत्रकार, संपादक, मंत्री ह्यांच्यासोबत त्याची खूप जवळिक होती. ह्या ओळखींमधून तो गरजूंची मदत करायचा. दांडग वाचन, कुठल्याही विषयावरील त्याच द्यान वाखाणण्याजोग होत. त्याच्याच आयुष्यावर सिंहासन चित्रपटातील निळू फुलेच पात्र उभारल अस मला वाटे.


त्याला आयुष्यात काहीच कमवायच नव्हत व गमवण्यासारख त्याच्याकडे काहीच नव्हत, ना घर ना दार ना पैसा ना कोणी हितचिंतक. कुठल्याही भावंडांच्या लग्नाकार्यातून पळापळीची काम करायचा, तळपणारया उर्जेच ते केंद्र होत, कधी मरगळलेल त्याच अवसान मी बघितलच नाही. लोकांकरता काही करण्यामागे त्याची कसलीच अपेक्षा नसायची तरीदेखिल त्याच्या भाळी फक्त उपेक्षाच आली. 

स्वभावाने तो कलंदर होता, एका ठिकाणी फार काळ टिकू न शकणे हे त्याच वैशिष्ट. मळके कपडे, पायात चपला कधीच नसायच्या, तोंडात सतत बीडी, आंघोळ करण्याचा कंटाळा, खिशात फार तर फार ५ रुपये. ट्रेनने बिनतिकिट प्रवास करायचा. त्याच्याकडे बघून वाटायच इतक्या हुशार माणसान आपल्या हुशारीचा फायदा करुन न घेता अस फकीर का जगाव? त्याला सगेसोयरे वेडा म्हणत पण तो वेडा नव्हता. त्याला वेडा म्हणणारयांहून चारपट हुशार होता, कदाचित अतिहुशारी हाच त्याचा दोष होता. त्याकाळी समाजामधून समजून न घेतल्या जाणारया कलाकारांचा तो प्रतिक होता.

ना कधी त्याने कोणाच वाइट केल ना चिंतल. काळाने, नशिबाने का त्याने स्वत:नेच ही त्यावर वेळ आणली? त्याने अस का केल? त्याला कोणी मार्गदशन का नाही केल? त्याच्या व्यसनांमधून त्याला कोणी मुक्त का नाही करवल? नानाविध प्रश्न आता मनात घोळतात.  विलक्षण जगला तसाच त्याचा अंत देखिल विलक्षण झाला. एका अपघातात तो पाय गमावून बसला. त्यानंतर काही वर्षांनी अस अवलंबून जीवनाचा कंटाळा आला व त्याने अन्न पाणी त्याग केल.

जोशी म्हणतात तस  वणवण फिरणाऱ्या अश्वत्थामा सारख त्याच आयुष्य, फरक एकच - 'तो' इतरांच्या जखमांवर फ़ुंकर घालत जगला. माझ्यासारख्यांच्या आयुष्यात inspiration म्हणून त्याची धग आजवर ज्वलंत आहे.

दिलीप पिंपळखरेच्या स्मृतीस अभिवादन.