सकाळी रिकाम्या रस्त्यावर तर कधी पर्वती; लॉ कॉलेज टेकडीवर मारलेला फेरफटका, घरी येइपर्यंत होणारी वर्दळ, रिक्षावाल्यांनी बिल्डींग खालून मारलेल्या पोरांच्या नावाने हाका, कूठे भाजीवाले, फेरीवाल्यांच्या आरोळ्या, हॉर्नचे आवाज, कचरा घेणारे, पेपरवाले, दुधवाल्यांची वर्दळ. कूकरच्या शिट्ट्या, आमटीचा वास, शाळेत जाणारयांची, ऑफिसला पळणारयांची एकच चेहेलपेहेल. हळूहळू पॉप्युलेशन, पोल्युशन, ट्रफिकच्या राक्षसांच रुद्र रुप जाणवत.
दुपारच्या कडक उन्हाच्या मारयात घराघरात घुइघुइ फिरणारे सिलिंग फॅन्स, कूठूनसे येणारे जेवणाचे खमंग वास, मग कामवाल्या बायकांची एकच रांग, एवढ्या प्रकाशात प्रकर्शाने जाणवतात ते भडक रंग बिल्डींग्सपासून लोकांच्या कपड्यांपर्यंत. जरा थोडा वेळाची शांतता मिळते न मिळते तोच शाळेतून घरी आलेल्या मुलांचा कॉलनी मधे धुमाकूळ, घराघरातून येणारे मराठी सीरीयल्सचे आवाज. निजानीज झाली की काळोख्या रात्री रस्त्यावर पसरलेल कूत्र्यांच साम्राज्य, मांजरांनीसुध्दा बंड पुकारुन त्यांना दिलेला प्रतिसाद... शुभ्र चांदण, रस्त्यांवरून स्ट्रीट लाइटसचा लख्ख प्रकाश, त्यावर झेपावून रातकिड्यांची आत्महत्या...हवेतील गुलाबी थंडी, निर्मनुष्य वेळ एन्जॉय करत पडलेल्या निपचीत वाटा.
करप्शन, कचरा, गरीबी हजार प्रॉब्लम्स असले तरी आठवतो तो विजांचा थयथयाट, पावसाचा टिनावर पडलेला रपारप आवाज, मातीचा पहिल्या पावसानंतर येणारा सुवास, चुलीखाली लाकड जाळून पाणी तापवणारया बायांचा त्रास, रस्त्यावर भाजलेल्या कणसाचा वास, उसाच्या गुरहाडाचा आवाज, भाविकांची भक्ती, आईची माया, रस्त्याच्या मधे रवंथ करत पडलेल्या गाई त्यांना डिस्टर्ब न करता येणारया जाणारयांची घाई, तर कधी ह्या रसिका करता ४ केळी घेऊन भेटायला आलेली जुनी कामवाली बाई.
लक्षात राहतो आजीचा बटवा आणि झाडाखालची फुल वेचणारे आजोबा...
0 comments:
Post a Comment