कालवा

Author: Rasika Mahabal / Labels: , ,


कसली ही तगमग कसली ही चढाओढ
दुसरयाला वाईट दाखवून स्वतःला वर ओढ
लोकांच्या वागण्यात काढायची सतत खोड
आपल्या कार्यातुन समर्थता दाखवणे नाही हा बोध

काहींच्या तोंडी सतत दुसरयाचे गाऱ्हाणे
एकाची पाठ फिरली की त्याला निंदेत नहाणे
दुसरयाचा मुर्खपणा म्हणुन आपण शहाणे?
स्वतःला हुशार ठरवायचे भलतेच हे बहाणे!

कोणाचे चांगले घडल्यास कौतुकात भिजवा
दुसरयाची प्रगती बघुन मनात मात्र जलवा
क्रोध, मत्सर, इर्षा, लोभ, लबाडीचा कालवा
कधी मीळायचा मनास निर्मळतेचा गारवा

दुसरयाचे कष्ट बनवा स्वतःचे भविष्य
तिसरयाची मेहेनत खपवा आपल्या नावावर अवश्य
समोरचा त्रासला तरी वागु असेच पुनःश्च
मनाच्या सुंदरतेतच नाही का सुंदर हे आयुष्य?

पत्ते

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,



रक्तातच आमच्या पत्त्याचे सेट
आजीकडून मिळाली ती आम्हांस सप्रेम भेट
आत्या काकांपासुन भाच्यांपर्यंत थेट
भेटल्यावर नेहमीच असतो पत्त्यांचा बेत

शाळेची सुट्टी उन्हाळ्याची
कडक उकाड्याचे दिवस
घरात गार हवा कूलरची
बसायचो घरात पत्ते पिसत

कधी मी गेले आजोळच्या गावी
तर भाऊबहिणी रमीचा डाव लावी
आम्ही सर्वे जुगारी भावी
ठरले मी रमीत नेहमीच डावी

बदामचा राजा किलवरची राणी
पत्ते कुटतांना ऐकत बसतो गाणी
पोकर खेळतांना लावतो नाणी
पाजते मी त्यात सर्वांना पाणी

खेळत असु तिनशेचार आम्ही आत्याच्या वाडी
उठत नसे तिथुन काही आमची गाडी
आत्या सारया करतात खेळात लबाडी
सर्वांकडे करते मी त्याची चहाडी

चुलत भाऊ आला घरी अगर
जजमेंन्ट खेळू आम्ही रात्रीचा प्रहर
वरतून उठू भल्या पहाटे लावून गजर
जिंकण्याची धमाल येत नाही त्याच्या बिगर

महाबळांनी शोधली सत्तीलावणी वेगळी
लावू शकतो पाहिजे तेवढे पत्ते एकाच वेळी
अश्या सत्त्या अठ्ठ्यांमधे आनंद मला मिळी
रस असला तुम्हास तर चला खेळू एक खेळी!

आठवणी

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , ,

आठवणी कधी नदीप्रमाणे ओथंबुन वाहणारया
तर कधी समुद्राप्रमाणे अथांग पसरलेल्या
आठवणी कधी पावसासारख्या रिमझिम बरसणारया
तर कधी तळ्याप्रमाणे शांत

कधी हिरव्या पानाच्या तर कधी पिवळ्या वेलीच्या


कधी कापसासारखी ऊब देणारया तर कधी बाभळीच्या काट्याप्रमाणे रुतणारया
आठवणी कधी विंचुच्या दंशाप्रमाणे झोंबणारया
तर कधी वुक्षाच्या सावलीप्रमाणे शितल

आठवणी कधी बेभान वारयासारख्या सैरावैरा पळणारया
तर कधी आकाशातील ध्रुवाप्रमाणे निश्चल
कधी पाण्यामध्ये निर्माण झालेले तरंग
तर कधी पावसानंतरचा इंद्रधनुष्य

आठवणी कधी अग्नीसारख्या ज्वलंत
तर कधी जणु गोठलेला बर्फ़
कधी पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुवास
तर कधी क्षितीज जो फक्त एक भास

आठवणी कधी सुरिल्या जशी मैफिलीत गायलेली तान
कधी मात्र अमावस्येच्या रात्री भयाण रान
कधी आठवणी पौर्णिमेचा चंद्र
तर कधी त्यांना काळ्या ढगांनी घेरल

आठवणी कधी झेपावती मनात जश्या उसळलेल्या लाटा
तर कधी शुभ्र चांदण्यांचा लाल नभात साठा
जरी असतो त्यात कधी सुखाचा गारवा तर कधी दुःखाचा ओलावा
तरी देतात त्या आपल्याला भुतकाळ परत एकदा जगायला

जो थांबला तो संपला

Author: Rasika Mahabal / Labels: ,



वेळ सुसाट पळत सुटला आहे. त्याला मुठीत धरण्याचा नाहक प्रयत्न मी सोडून दिला आहे. वेळेबरोबर मी सुध्दा पळत आहे, अगदी जीव मुठीत घेऊन.

कधीकधी नुसतच क्षणभर थांबून बघते की तो किती जोरात पळत आहे आणि आत्तापर्यंत किती जोरात पळत आला आहे. तो दमत कसा नाही? जरा सावकाश का जात नाही? त्याला जरा दमाने घे अस सांगण मी सोडून दिल आहे. जो थांबला तो संपला अस म्हणतात. पण आपण जर थांबलोच नाही तर कळेल कस की आपण दोघे अशी धुमासार स्पर्धा करत आहे एकमेकांशी.

वेळेला मागे टाकून हरवायच स्वप्न तर मी सोडूनच दिल आहे. दिवस उजाडला की पळता पळताच मी ठरवते की आज काय काय गाठायच आहे. मग ह्या धावपळीत कुठल्यातरी मुक्कामास नुसता खो देऊन पुढे पळत सुटायच आणि काही ठिकाणी धावता धावताच जरा घुटमळायच.

दिवसभराच पळण कमी होत बहुदा. म्हणूनच झोपेत माझ मन धावत सुटत. निरनिराळ्या ठिकाणी जाऊन निरनिराळ्या लोकांना भेट देऊन येत. कधी मन थकून शरिराबरोबर जरा विश्रांती घेत तेव्हा मेंदु धाव घेतो. स्वप्नातच आजकाल लेख लिहितो, कविता करतो, दुसरया दिवशीचा बेत व वेग ठरवतो.

वेळ धावत राहतो पण कधीकधी मीच थांबते; दमले नसले तरीसुध्दा. आयुष्यात घडणारया गोष्टींना जडलेल्या भावना मनात झिरपवायला; त्यांच नुसत ’असणं’ जाणवायला !

किल्ल्या

Author: Rasika Mahabal / Labels: , , , , , , ,


बाहेरुन घरात आल्यावर लॉक लावुन मी किल्ल्या भिरकावून लावते. मग परत बाहेर जायच्या वेळी मला तयार व्हायला ५ मिनिट आणि घराच्या किल्ल्या शोधायला १० मिनिट लागतात. या धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात आपण आठवणींच्या बाबतीतसुध्दा असच करतो. मनात निरनिराळे कप्पे करतो त्यात निरनिराळे अनुभव, अनुभुती, भावना, आठवणी नकळत भरत राहतो.

आपल्या यांत्रिक जीवनात मग आपण ह्या कप्प्यांना घट्ट कुलुप घालुन धुळ खात पडु देतो. निवांत विचार करत बसलो आहोत आणि त्यातुनच मनाचा एक एक कप्पा उघडत जातो आहे आणि आठवणी ताज्या होत आहेत अस फार कमी वेळेला होत. आयुष्य अगदीच यांत्रिक राहु नये म्हणुन आपल्या नकळतच आपल्या मनाने त्याच्या कप्प्यांच्या किल्ल्या कुठेकुठे पेरुन ठेवल्या असतात ज्या हलकेच आपल्याला भुतकाळात घेउन जातात. त्याची अनुभुती तुम्हालाही झाली असेल.

कुठुनशी अलगद हवेची झुळुक येते आणि एका कप्प्याला उघडुन जाते. मग मन उडुन जात, पुर्वीसुध्दा अश्याच आलेल्या हवेच्या झुळुकेभोवती उडु लागत. मनाने त्याच्या काही किल्ल्या वासांमधे लपवल्या असतात. मग पावसानंतर येणारा मातीचा सुगंध कुठेतरी दुर, तुमच्या गावातल्या रानात तुम्हालाही घेऊन जात असेल. स्पर्शामधेसुध्दा एक किल्ली लपलेली असते. आईच्या जुन्या साडीच्या चौघडीचा स्पर्श झाला की ती पुन्हा तिच्या कुशीत नेऊन सोडते.

काही वेळा अशी एखाद किल्ली आवाजांमधे असते. जस समुद्राचा खळखळणारा नुसता आवाज ऐकला की आपण कोकणातल्या, गोव्यातल्या (किंवा तुम्ही कदाचीत हवाईच्या) समुद्रकिनारयावर जाऊन पडता आणि त्या खारया पाण्यात मनसोक्त डुंबु लागता. कधी कुठुनस गाण ऐकु येत आणि आपण कॉलेजच्या सहलीबरोबर काळोख्या रात्री लावलेल्या शेकोटीभवती तेच गाण म्हणत नाचतांना सापडतो.

कधी कधी किल्ली नावांत असते, मग त्यातल एखाद नाव ऐकल; वाचल की ती भराभर कुलुप उघडुन आठवणींना बाहेर काढते. सुखाच्या, दुःखाच्या, अवहेलना, अपमानाच्या तर कधी मैत्रीच्या. कधीकधी कुठल्यातरी नावाकडे ’मास्टर की’ असते. मग ते नाव ह्या सर्वच आठवणींना उचंबळुन बाहेर खेचत.

आणि अशातच पुन्हा अस्तित्त्वाची जाणीव होते आणि आपण सैरावैरा पळणारया मनाला पकडतो, विखुरलेल्या आठवणींना गोळा करतो. परत त्यांना कप्प्यांमधे भरुन किल्ल्या भिरकावून लावतो!

महाभारत

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,




जर तुम्ही महाभारताच्या काळात जन्मलेला होता (म्हणजे बी. आर. चोप्राच्या) तर तुम्हाला पण आठवेल की दुरदर्शन वर महाभारत चालु झाल की रस्त्यावर सामसुम व्हायची. घरी टी.व्ही. नसलेले लोक टी. व्ही. च्या दुकानासमोर गर्दी करायचे. रामायण, महाभारताच्या काळातच सर्वात जास्त टी.व्हींचा खप झाला असावा. घरातली सर्व मंडळी हातातली काम सोडुन टीव्हीला चिकटुन बसायची. रविवार सकाळी उठल्यापासुन वाट बघण सुरु व्हायच ते अथ श्री महाभारत कथा अस गाण चालु झाल की मग जीव भांड्यात पडायचा. दुरदर्शनच्या महाभारताच्या वेळी मी खुपच लहान होते, तेव्हा मी फक्त बाणांचे युध्ध वगैरे गोष्टी एंजॉय करायचे.

मी आठवी नववीत असतांना पुन्हा महाभारत केबलवर बघायचा योग आला आणि तेव्हा मी त्यातील नाट्य खरोखरच समजु शकले. पुढे कॉलेजला असतांना लायब्ररीमधुन महाभारताचा पहिला खंड वाचायला आणला पण आमच्या मातोश्रींने ’घरात महाभारत वाचल की ते घरातसुध्दा घडत’ अस म्हणुन ते परत करायला लावल. तेव्हा ’शनिवारी नख नाही कापायचीत, रविवारी केस नाही धुवायचेत, जीन्स घालायची नाही, संध्याकाळी ७ च्या आत घरात हव’ अश्या काही किरकोळ आणि काहि महत्त्वाच्या विषयांवर लढा देण्यात मी माझी सर्व शक्ती वापरत होते. त्यामुळे महाभारतावरुन महाभारत न करता मी ते परत करुन माझी तेव्हाची आवडती लेखिका कुमुदिनी रांगणेकर ची पुस्तक आणलीत.

व्यासपर्व - दुर्गा भागवत
इतक्यात दुर्गा भागवतच व्यासपर्व वाचल. वाचण्याआधी थोड कचरत चालु केल कारण महाभारत खर घडल असेल तर ते घडुन १०,००० वर्ष होउन गेलीत आता कोणती व्यक्ती कशी होती, कोणाच कुठे चुकल वगैरे विचार करण्यापेक्षा फक्त त्यातील नाट्याचा आनंद उठवायचा. पुस्तक वाचायला सुरु केल्यावर मात्र सोडावल नाही, इन फॅक्ट संपल्यावर अस वाटल हे अजुन थोड मोठ हव होत. पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल ह्यात यत्किंचीतही संशय नाही. महाभारत लहानपणापासुनच भारतीयांच्या नसानसात भिनल आहे. त्यातील साफल्य, वैफल्य, औदासिन्य, कर्ममयता, वेग-आवेग, तत्त्वद्यान, सौदर्य, उदारता, कारुण्य, द्वेष, क्वचित कामुकता, शोकक्रंदन, क्रौर्य, वीर्य, धैर्य ह्या सर्वांचे आपण चाहते आहोतच. लेखिकेने हे पुस्तक महाभारतातील उन्मत्त, गर्विष्ठ, नम्र, विरक्त, उदार इत्यादी अर्क पात्रांवर रचल आहे. व्यासाच्या जगावेगळ्या लिखाणशैलीचे तिने वर्णन केले आहे. लेखिकेची मराठी खुपच अलंकारीक आहे ती समजायला मला थोडा त्रास झाला. पण ऍट द सेम टाइम मराठी भाषेच सौदर्य जाणवल.

पुस्तक वाचुन बघा, मग तुम्ही पण म्हणाल ’हे अजुन थोड मोठ हव होत’.

ह्र्दयस्थ - डॉ. अल्का मांडके

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,


ह्र्दयस्थ ही कहाणी आहे मुंबईत मराठी माणसाच पहिल cardiac hospital उभारण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या आणि ते स्वप्न पुर्ण करणाऱ्या स्वर्गीय डॉ. नित्यनाथ (नितु) मांडकेंची. हे पुस्तक त्यांच्या बायकोने लिहिले आहे ज्या स्वतः अनस्थेटीक सर्जन आहेत. अल्काने हे पुस्तक कमालीच मनमोकळेपणाने लिहिल आहे.

मला रागीट, sarcastic, ज्यांना लोकांच्या दिसण्यापासुन असण्यापर्यंत काहीतरी comment असते, ज्यांच्या दुर्बिणीखाली लोक head to toe असतात, ज्यांचे विनोद निखळ व situational नसुन कोणत्या तरी व्यक्तिला target करुन केले असतात अश्यांची सोबत आवडत नाही. अश्यांबरोबर मला फार conscious व्हायला होत, I can not be myself. डॉ. नितु वरीलपैकी सर्व काही होते. ह्या पुस्तकातील पात्र अशी काही रंगली आहेत की जणू ती तुम्ही नुसती वाचत नसून तुमच्या सहवासात आहेत. त्यामुळे साहजिकच मला डॉ. नितु जागोजागी खटकत होते. ते एक ideal पती किंवा पिता नाहीत अस पदोपदी जाणवत होत. त्याउलट अल्का मांडकेंच सहनशील, समंजस, विचारी nature मला खुप भावल.

हे सर्व असुन देखिल डॉ. नितुंचा सहवास मला सोडवत नव्हता. त्यांची प्रचंड हुशारी, करारी, मिश्कील स्वभाव, भारदस्त व्यक्तिमत्त्व मला हळुहळु भुरळ घालत गेल. त्यांच्याबद्द्ल काहीतरी mystical अस होत जे मला अजुन पुढे वाचत राहण्यास मजबुर करत होत. आयुष्यात खुप जास्त successful होणारी लोक कदाचित aggressive असतातच. Aggression हा success चा एक ingredient च नाहीये का?

डॉ. नितुंच्या धडाडी, हुशारीमुळे व डॉ. अल्कांनी दिलेल्या साथीमुळे भारतास त्यांच्यासारखा उत्क्रुष्ट ह्र्दय सर्जन मिळु शकला.
पुस्तक क्वचीत ठिकाणी डॉ. नितुंबद्दल नसुन लेखिकेची personal diary आहे अस वाटत, जस की ते लोक कोणाकडे जेवायला गेलेत मग त्यांच्यात काय संवाद झाला वगैरे तिने नमुद केले आहे. ह्या काही गोष्टी कंटाळवाण्या होत नसल्या तरी त्या related वाटल्या नाहीत. डॉ. नितुंची बुध्दिमत्ता, ध्येयवादी व्रुत्ती, ते पुर्ण करण्याकरता त्यांनी केलेल प्रचंड hard work हे सर्व मला motivate करुन गेल. डॉ. नितुंना गरिबांबद्दल वाटणारी हळहळ, त्यांनी असंख्य लोकांना केलेली असंख्य तह्रेची मदत, त्यांची प्रचंड talented personality ह्यांनी मला कळत नकळत त्यांच्या प्रेमात पाडल. हे पुस्तक वाचुन बघा ते तुम्हालाही प्रेमात पाडतील.

भारतात अजुन असे अनेक नितु मांडके होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

रंगपंचमी - व.पु. काळे

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



कस कोणी इतक प्रतिभाशाली असु शकत, कस कोणी एवढ सुंदर लिहु शकत. आपल्या लिखाणातून लोकांना हसवत, रडवत, चिड आणत तर कधी जीव भांड्यात टाकत. कस कोणी त्यांच्या लेखांमधून वाचकांना डोळ्याची पापणी बंद न करता वाचावयास भाग पाडत. वाचकांना स्वतःच्या भाषाशैलीत भिजवत, मोहक विचारांनी रंगवत, आपल्या दिलखुलास गोष्टींमधून ओलचिंब करत.

एकाच रंगाच्या जश्या अनेक छटा असतात तश्या लिखाणाच्या विषयांच्या अनेक छ्टा असलेल्या माझ्या प्रिय स्व.व.पु. काळेंना माझा साष्टांग नमस्कार. त्यांच्या लिखाणावर प्रेम बसुन त्यांची नित्सिम भक्त होण्यास त्यांच एकच पुस्तक पुरेस होत. वपुंच्या भक्तांकरता ती पोथीच आहे. पुस्तकाच नाव आहे - वपुर्झा.

जगातले सर्वच अनुभव स्वतःने घेणे अशक्य आहे. लोकांच्या अनुभवांबद्द्ल वाचून आपल्याला एक निराळच आयुष्य जगता येत. निरनिराळ्या लोकांच्या सुख, दुःख, त्याग, राग, मोह, इर्षा, यश, अपयश, चिकाटी आणि काहि जगावेगळ्या अनुभुतींमधून वेगवेगळ्या पैलुंची प्रचिती होते.अर्थात तुम्ही काय वाचता ह्यालासुध्दा महत्त्व आहे. कधी कधी पुस्तक तुम्हाला भारावून टाकतात तर कधी ती तुमचे त्यक्तिमत्त्व व विचार बदलण्यास कारक ठरतात. त्यामुळे योग्य पुस्तक वाचण हे आपल्याच हातात असत.

इतक्यात ’रंगपंचमी’ नावाच वपुंच पुस्तक वाचल. नावाप्रमाणेच हे तुम्हाला भिजवून, रंगून टाकेल.

रंगपंचमी ही त्यातील माणसांच्या उत्साही सहभागामुळे आणि विविध रंगांच्या उधळणीमुळे साजरी होते.
आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगळीवेगळी माणसे आपल्याला सामील होतात. हे पुस्तक वपुंच्या आयुष्यात आलेल्या माणसांवर आहे, ज्यांनी त्यांना बहरायला, फुलायला, रंगीबेरंगी करायला हातभार लावला. त्यातील प्रत्येक माणसाचे रंग निराळे, कधी शहाणपणाचे, कधी वेडेपणाचे, उत्साहाचे तर कधी नैराश्याचे. वपुंची छोट्या छोट्या प्रसंगांनी रंगलेली ही रंगपंचमी तुम्ही नक्कीच एंजॉय कराल.

सूर्या रे प्राण हा तळमळला...

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,



सकाळ पेपर मधे माझा आर्टिकल छापून आला तो इथे कॉपी पेस्ट करत आहे:

सूर्या रे प्राण हा तळमळला...

सिऍट्ल - मायक्रोसॉफ्ट च माहेरघर आणि तसच संपुर्ण अमेरिकेत सर्वाधिक खप असलेल्या स्टारबकस कॉफीच माहेरघर. चहु बाजुंनी डोंगरांनी आच्छादलेल्या ह्या गावाला पाचुसारखे हिरवेगार शहर म्हणतात. अमेरिकेतील टक्केवारीनुसार सर्वाधिक सुशिक्षित आणि सर्वाधिक सुद्रुढ लोकांच गाव. संपुर्ण अमेरिकेत सिऍट्ल मधला कॉफीचा खप आणि लोकांच्या आत्महत्यांचा रेट सर्वात अधिक. मला वाटत त्याच कारण - इथल हवामान. दहा महिने फक्त पाऊस,थंडी आणि काळे ढग म्हणून उर्जा मिळ्वायला लोक न चुकता व्यायाम करतात, कॉफी पितात, किंवा नैराश्य येऊन जीव देतात. इथल्या सूर्यदर्शनाच वर्णन मी अस करीन:

क्षणभर डोळे मी मिटले
होते त्यांना सूर्यकिरणांनी दिपले
उघडुन त्यांस पुन्हा रविस बघितले
तर होते त्याला काळ्या ढगांनी घेरले

सतत पावसाचा वर्षाव होणाऱ्या सिऍट्ल मधे चक्क तळपतं ऊन पडलय. कालपर्यंत थंडी आणि पाऊस असतांना आज अचानक ऊन! निसर्ग रंग बदलतो, सिऍट्ल मधे तर तो सरड्यासारखा वागतो. कधी पाऊस, कधी थंडी, कधी स्नो, ऊन्हाच दर्शन मात्र फार कमी वेळा देतो. सूर्य बघायला इथे डोळे आसुसतात, सतत दोन-दोन लेयर्स मधे गुरफटलेल शरिर मोकळा श्वास घ्यायला तडफडत. तळपत्या ऊन्हात समुद्रावर जाऊन गार वारा खायला माझा जीव कासावीस होतो.

संपूर्ण जगाला उर्जा देणारा दाता प्रसन्नला
काळ्या ढगांवर प्रहार करुन अखेर त्याने विजयश्री मिळविला

चटके बसणार ऊन असुनही मी गच्चीत बसून त्याचा मारा व्रूक्षाच्या सावलीत बसल्याप्रमाणे सहन करते आहे. माझ्या मागे उभी स्पेस नीडल ऊन्हात लख्ख चकाकत अजुनच सुंदर भासतेय. समोर दिसणाऱ्या निळ्याक्षार समुद्र्यावरुन सूर्याच प्रखर प्रतिबिंब माझ्या डोळ्यात जातय आणी चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो तशी सूर्याच्या दर्शनाची वाट बघणारे माझे डोळे त्याला चांदण्याप्रमाणे झेलत आहेत. छोट्या, मोठ्या, रंगीबेरंगी बोटी संथपणे ऊन खात जा ये करत आहेत. माझ्या डाव्या बाजु्च्या डाऊनटाऊन मधल्या आकाशाला भेदू पाहणाऱ्या इमारती सनबाथ घेत ऐटीत पसरल्या आहेत आणि त्याच्या कडेला निम्मा बर्फ वितळून गेल्याने भकास भासणारा माउंट रेनीअर स्वत:च्या अस्तित्त्वाची जाणीव करुन देत आहे. वस्तु न वस्तु उजळून निघाली आहे.

निसर्ग निराळ रुप सजवणार
दोन महिने आता सूर्यकिरण बरसवणार
सिऍट्लला धरतीवरील स्वर्ग भासवणार
आपले सौदर्य लोकांच्या मनात भिनवणार


-रसिका महाबळ

फॉर हीअर ऑर टु गो - अपर्णा वेलणकर

Author: Rasika Mahabal / Labels: , ,

अपर्णाने अर्धशतकापुर्वि अमेरिकेत आलेल्या मराठी माणसांच्या आयुष्यावर हे पुस्तक लिहिल आहे. लेखिकेने पुस्तकाचा फ़्लो कमालीचा सुंदर ठेवला आहे. तिने विविध चॅप्टरस मधुन अमेरिकेतील मराठी माणसाच्या आयुष्यातले सर्वेच पैलु कव्हर केले आहेत. लेखिकेने पुस्तकात खालील विषयांवर कहाण्या लिहिल्या आहेत:

१. मराठी माणस इथे का व कधी येउ लागलीत
२. त्यांना इथे येण्याकरता आणी इथे आल्यावर सहन करावे लागलेले त्रास
३. इथे धड्पड करुन धंदा/ जॉब मध्ये प्रचंड यश मिळालेंच्या आणि धडपड करुन सुध्दा हाती निराशा आलेल्यांच्या कहाण्या
४. इथे आलेल्या मुलांची भारतातल्या मुलिंबरोबरची लग्न आणी कधी त्यातुन झालेली फसवणुक
५. मिश्र विवाह - भारतीयांने निवडलेले अमेरिकन साथिदार
६. इथे येउन अमेरिकनाइझ्ड झालेले काही तर काही मराठी संस्क्रूती उगाळत बसलेले आणी काहि दोन्हिंमधिल मध्य साधण्याच्या झटापटीत गुंतलेले.
७. इथे पर्फॉम करायला येणारया कलावंतांच्या चांगल्या - वाईट वागणुकीचे कीस्से
८. अमेरिकेत निघालेल्या मराठी व्रुत्तपत्र, पुस्तक, मॅगझिनस आणी महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेचा इतिहास
९. अमेरिका व भारत ह्या दोन्हि देशात राहण्याचे फायदे व गैरफायदे
१०. एबीसीडीज ची व्यथा
११. अमेरिकेत येणारे सासु- सासरे/ आई- वडिल - काही सारखे कंटाळलेले तर काही एकदम उत्साही
१२. इथे लग्न करुन येणारया पण जॉब न करणारया मुलींची गोष्ट
१३. काही इथे राहण्याचा निर्णय घेतलेल्यांच्या, काही परत गेलेल्यांच्या, तर काही अजुनही 'पुढल्या वर्षी परत जाऊ' असे बेत आखणारयांच्या
१४. महाराष्ट्र मंडळाच्या चांगल्या वाईट बाजुंच्या
१५. इथे आयुष्यभर राहुन इथेच निव्रुत्तीचे आयुष्य घालवणारयांच्या

लेखिकेने आनंदीवाई जोशींपासुन, येथील ग्रोसरि प्रॉब्लम ते देशापासुन-आपल्यांपासुन दुर राहण्यामुळे होणारा मानसिक त्रास नमुद केले आहेत. सर्व गोष्टी लेखीकेने इथे आलेल्या पिढीचा अभ्यास करुन स्वत:च्या ऑबझर्व्हेशनस वर आणी त्या पिढीतिल लोकांच्या मुलाखतींवर बेस्ड ठेवल्या आहेत.

मला हे पुस्तक खुपच आवडले, तुम्हालाही नक्कीच आवडेल अस कॉंफीडंट्ली सांगते...

गोष्टी माणसांच्या - सुधा मुर्ती

Author: Rasika Mahabal / Labels: , ,

२-२ पानांच्या अतिशय रंजक ३२ गोष्टींच पुस्तक


लेखिका सुधा मुर्ती यांचे अनुभव जगावेगळे नसले तरी ते मांडण्याची पध्दत आणि त्यातून झालेले वाचकाचे उदबोधन यामुळे ते वेगळे ठरतात. आपल्या आजुबाजुला घडणारया गोष्टींकडे पाहण्याचा ठराविक द्रुष्टिकोन बदलुन त्याकडे पाहण्याची नवी द्रुष्टी हे अनुभव देतात.
दैनंदिन जीवन जगतांना अनुभवायला मिळणारे चढ-उतार सहज सोप्या शैलीत लिहिण्याच्या लेखिकेच्या हातोटीमुळे हे अनुभव कंटाळवाणे होत नाहीत. त्यामुळे वाचकाच्या विचारांना चालना मिळते. कथेच्या अंती वाचकाच्या मनात नवीन विचार रुजवायचा, या कथेतून त्याला आत्मचिंतन करायला उद्युक्त करायचे पण हे काम वाचकाच्याही नकळत करायचे अशी पध्दत लेखिकेने स्विकारली आहे.

पुस्तक वाचतांना मी नेहमीच त्यातील आवड्लेली वाक्ये किंवा त्यावरचे माझे विचार लिहुन ठेवते पण हे पुस्तक वाचतांना मी एवढी जास्त त्यात गुंतुन गेले होते की पुस्तक संपल्यावरच मला शुध्द आली की मी काहीच लिहुन ठेवले नाही.

गोष्टी माणसांच्या हे लिना सोहोनी च अनुवादित पुस्तक आहे. मुळ पुस्तक ’how I taught my grandmother to read' इंग्लिश मधून आहे.

हे पुस्तक जरुर वाचा.

वीर सावरकर (सिनेमा)

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,



मी स्वतःला आणि स्वातंत्र्याच्या काळात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तिस नशिबवान मानते. भारतावर ६० वर्षांपूर्विपर्यंत विविध प्रांतांनी invasion केल. स्वातंत्र मिळवण्यास किती लोकांनी प्राणांची आहूती दिली, कितींनी इंग्रजांनी केलेले जुलुम सोसले हे कदाचित आपल्याला कधिच नाही कळणार. मला ह्या हुतात्म्यांच नवल वाटत... किती द्रुढ संकल्प आणि त्याकरता जिवाची बाजी लावायची पण तयारी. ह्या सर्व देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेल्या शुरांना माझा अगदी मनापासून नमस्कार.

हा चित्रपट सावरकर संस्थानाने जमा केलेल्या donations मधून बनवला आहे. त्यामुळे quality wise खूप expectations ठेवू नका (म्हणजे भगतसिंग वर जसे फॅंसी सिनेमे निघाले होते तसा नाहीये) सिनेमातील संवाद प्रभावित करतात. अभिनय ठिक ठाक, कुठेही भडकपणा वाटत नाही हे चांगल. टॉम आल्टर नेहमीप्रमाणे खडूस इंग्रजाच्या भूमिकेत प्रचंड प्रमाणात हॅम सिन्स देतो.
'ने मजसि ने परत मात्रूभूमिला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा' ह्या गाण पूर्वि ऎकलेल असून देखिल चित्रपट बघितल्यावर पहिल्यांदाच त्याचा अर्थ मला कळाला अस वाटल. गाण्याच्या बोलांतील भावना मला पहिल्यांदाच जाणवल्या. इंग्रजांनी केलेले अत्याचार, आपले काही भारतीय देशाच्या स्वातंत्र्याकरता लढत असतांना उरलेल्या जनतेने पैशाच्या, प्रतिष्ठेच्या लोभाने इंग्रजांना दिलेली साथ, १५-१६ वर्षांच्या मुलांनी सूध्दा देशाकरता केलेले त्याग, क्रांतिकारयांनी कारागारात भोगलेले त्रास सर्व बघून खूप वाईट वाटत. एक गोष्ट मला नककीच जाणवत आहे की आपल्याला एवढ्या कष्टांनी मिळालेल्या स्वांतंत्र्याला taken for granted treatment न देता स्वातंत्र्याचा respect करून त्याचा देशाच्या कल्याणाकरता उपयोग करायला हवा.

नि:शब्द झुंज - रेणू गावस्कर

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



रेणूने तिचे संपूर्ण आयुष्य विविध सामाजिक कार्याकरता आणि खास करुन महिलांच्या कल्याणाकरता वाहून नेल आहे. आयुष्यभर केलेल्या सामाजिक कार्यांमधील तिच्या अनुभवांवर हे पुस्तक आहे. लेखिकेने आयुष्याशी नि:शब्द झुंज देणारया लोकांचा बराच अभ्यास केला आहे. इतरांच्या कल्याणाकरता संपूर्ण आयुष्य जुंपणारे लोक कमीच असतात. रेणूने केलेल्या कामाकरता मी तिचा आदर करते.

पूस्तकातील कथा खूप हळूहळू पकड घेतात. त्या गोष्टींमध्ये substance असला तरी सुरुवातीच्या कथा भरकटलेल्या वाटतात. आयुष्यात नाना तर्हॆचे जुलुम सहन केलेल्या लोकांच्या गोष्टी असूनसुध्दा त्या मनास स्पर्श करत नाहीत. जस की लेखिकेने रमा नावाच्या एका मुलीची गोष्ट लिहिली आहे की "कॉलेजात जाणारी रमा एका मुलाच्या प्रेमात पडली आणी त्यातूनच गरोदर राहिली. परंतू ह्यास जबाबदार मुलाने तिची फसवणूक केली व पळून गेला. रमाच्या 'कर्मठ घराला भोवळ आली'. मुलीला झालेल्या संततीस त्यांनी अनाथाश्रमात दाखल केली."

ह्यात मला न पटलेला भाग असा की कॉलेजात जाणारया शिकल्या सवरलेल्या मुलीला त्या मूलाने फसवले की तिने स्वतःचीच फसवणूक करून घेतली? तिने मूलाच्या कुटूंबाची काहीच माहीती नाही मिळवली? समाजाने काही नियम बनवले आहेत ते तोडून १८ वर्षाच्या मुलीने अभ्यास करण्याच्या वयात आपण गरोदर असण्याची बातमी दिल्यास कोणते माता पिता खुष होतील? त्यांना का म्हणे कर्मठ करार दिला?

स्वातंत्र व स्वैराचार ह्यात फरक नाहीये का?

पण हे सर्व घडल्यावर काही मूलींना त्यांच्या चूकीची जाणीव होत असेल आणि आयुष्यक्रमणा नव्याने सुरू करण्याची, आपल्या पायावर उभी राहण्याची ईच्छा होत असेल. पण समाज व संस्था भूतकाळाचा कोळसा विसरायला तयार नसुन तोच कोळसा परत उगाळत बसते. अशा स्त्रियांना संस्था आधार देतात पण त्यांना independently बाहेरच्या जगात वावरता येइल अस मार्गदर्शन देतात का? त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्न करतात का?

हा पॅटर्न चेंज व्हायला कदाचित भरपूर वेळ लागेल. ह्या सर्वात जन्माला येणारया मुलाची काहीच चूक नसतांना चूकीचे चटके मात्र त्यालाच भोगावे लागतात. आणि मग आईने आपल्याला पोटातच का मारुन टाकल नाही असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात.

आता ही रमाची गोष्ट असो वा निशाची. गुंड व विवाहीत मनुष्य आहे हे माहीत असूनदेखिल निशा त्याच्याशी लग्न करते आणि मग त्याने मारहाण केली आपल्याला फसवले हे कोणत्या अधिकाराने म्हणते? खरच परिस्थितीच्या कुचंबणेत येऊन अनर्थ घडलेल्या, जीवन उध्वस्त झालेल्या महिलेंची उदाहरण लेखिकेने का दिली नाहियेत हा मला प्रश्न पडला. रमा, निशा सारख्या मुलींच्या मुर्खपणास समर्थन करून पुरुष जातीला नाव का ठेवली आहेत? केवळ स्वतः एक महिला आहे म्हणून...?

कधीतरी एखाद दुसरया वाक्यात रमाचे निर्णय चुकीचे होते वगैरे वाचुन माझा राग जरा शांत झाला :)
पूस्तक वाचतांना हे निश्चितच जाणवत की आपल्या सामाजिक चौकटी, त्यात कोंबून बसलेले आपले विचार, शैक्षणिक प्रक्रियेतील त्रुटी, नीतिमत्तेच्या कल्पना, सामाजिक संस्थांच स्वरुप, शाळांमधून लैंगिक शिक्षणाची गरज या सर्वांचा विचार झालाच पाहिजे.

लेखिकेने केलेले विविध प्रकारचे उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. जस की:
वेश्यांसाठी चालवलेला उपक्रम, वेश्यांच्या मुलांकरता चालवलेल्या शाळा, निरनिराळ्या शाळांमधुन मुलिंना दिलेले लैंगिक शिक्षण, दारुच्या सवयीने ग्रस्त असलेल्या पुरुषांच्या बायकांना मानसिक आधार, अनाथाश्रम व महिला कल्याण संस्थांमधिल गरजुंना दिलेला आधार आणि अजुन बरच काही.

दारुवरील गोष्ट वाचतांना मला वाटले की दारुसारख्या गोष्टीस सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे. आजकाल सर्रास शिकली सवरलेली मंडळी पार्टीजच्या नावाखाली मद्यपान करतात, तिथे आलेली एखादी व्यक्ती करत नसेल तर ह्या घोळ्क्यात आपण 'कुल' आहोत हे दाखवायला दारु पिण सुरु करते. मग हळुह्ळु पार्टीज, गेट टुगेदरस = दारु हे इक्वेशन बनते. काही काळाने पार्टीमध्ये दारु नसल्यास त्यांना मजा कशी करायची, पार्टीतला वेळ कसा घालवायचा हेच कळत नाही. कोणी stress घालवायला तर कोणी मित्र टिकवायला दारुच्या आहारी जात राहतात. खरच enjoy करण्याकरता दारु महत्त्वाची असते का?

लेखिका म्हणते की "समाजाची भुमिका कुमारी मातांच्या बाबतीत पक्व असायला हवी" हे वाचतांना मला एक असा प्रश्न पडला की ख्ररच समाजाची भुमिका पक्व असती तर गोष्टी सुधारल्या असत्या? का बिघडल्या असत्या?
समाजाच्या भितीने अशी प्रकरण कमी होत आहेत?
समाजाची भुमिका बदलल्यास कुमारी मातांची संख्या बिनबोभाट वाढेल?

ह्यावर तुमचे काय विचार आहेत ते मला नक्की कळवा, मला जाणुन घ्यायला निश्चितच आवडेल.

गौरी, गौरी कुठे आलीस ...?

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



इतक्यात शोभा चित्रे च गौरी, गौरी कुठे आलीस ...? हे पुस्तक वाचल
हे पूस्तक 'मौज' ह्या दिवाळी अंकातून आणि अन्य नियतकालिकांतून प्रसिध्द झालेल्या ललित लेखांचा संग्रह आहे.
पूस्तकातील सर्व कथा लेखिकेच्या परदेशातील वास्तव्याशी निगडीत आहेत. सर्वच कथा सुंदर आहेत. मी प्रत्येक गोष्टीमधे कुठे ना कुठे तरि रीलेट करु शकले.

जस की एका ठिकाणी लेखिका म्हणते:

"तेवढ्यात एक पाकोळी कुठूनशी मनात भिरभिरते. भोवती जमवलेला हा एवढा सारा गोतावळा आणि आपण यांत शेवटी समान काय? या जमलेल्या किती लोकांशी आपली तार मनापासून जुळतेय? गोड गोड बोलणारे अन आतमध्ये दुसयाच भावना जपणारे काही. तरीहि नित्यनियमान तोंडात खडीसाखर ठेवून आपल एकत्र येण!"

मला वाटायच की मीच आपली मैत्रिसारखी गोष्टसुध्दा कठिण करते आहे; खुप चुझि वागुन. एखाद्या व्यक्तिबरोबर तारा जुळल्या नाहीत तर मी निव्वळ औपचारिकता म्हणून कधिच भेटत नाही; कितीही एकलकोंडेपणा वाटला तरी पण. गरज आहे म्हणून किंवा करायला दूसर काहिच नाही म्हणून वेव्हलेंथ जमत नसलेल्यांबरोबर सुध्दा उगीचच वेळ दवडणे म्हणजे वेळ वाया घालवणेच नाही का? ते मला जमत नाही म्हणुनच जे लोक कोणाशीही संभाषण करु शकतात,ज्यांना मित्रपरिवार जमवायला फारशी आवड निवड नसते त्यांना मी लकी मानते: मैत्रिसारखी गोष्ट कदाचीत साधी सरळ आणि सोप्पीच ठेवायला हवी.

खालील वाक्यात लेखिकेने दर्शवलेला विरोधाभास मला खुप आवडला:

"स्वत: इतकच ब्रिटीश लोक दुसयांच स्वातंत्र जपतात म्हणे. मग दीडशे वर्ष आपल्या देशात राहून काय आपल स्वातंत्र जपल का? स्वत:च्या व्यक्तीगत स्वातंत्र्याच स्तोम माजवणारया या इंग्लिश लोकांनी जगभरच्या किती लोकांच राजकीय स्वातंत्र लुबाडल, पायदळी तुडवल, त्यांच व्यक्तिस्वातंत्र्य नष्ट केल."

'ट्रेझर चेस्ट' कथा मला खास करून आवडली. मला वाटत सर्वांच्याच घरात असे पेटारे असतील ज्यात आपण आपल्याला न लागणार सामान वर्षा नू वर्ष भरत राहतो आणी एक दिवस त्याच्यातून काहितरी काढण्याची वेळ येते आणि तो एक ट्रेझर हंट्च होतो. अनेक वर्षांपासून दडलेल्या ह्या मालमत्तेत खरच काही महत्त्वाच सापडत असेल तर त्या आहेत आठवणी. इथे अगदी मोजकच सामान आहे माझ्याकडे, पूण्याला ह्या वर्षी गेल्यावर मी नक्कीच हा ट्रेझर हंट करणार आहे. माधूरी दिक्षीत, देव आनंदची गाणी असलेल्या व्हिडीओ टेप्स, कदाचित व्हिडीओ टेप्स चा एक खजानाच सापडेल मला - टॉम अँड जेरी, चित्रहार, अनेक जुने पिक्चरस. जुने फोटोज, काहीतरी लिहुन ठेवलेल्या चिठ्ठया चपाट्या, पत्र, ग्रिटिंग कार्डस, गाण्यांच्या ऑडिओ कॅसेट्स, प्रचंड प्रमाणात पूस्तक, ज्योतिष शिकत असतांना शेकडो लोकांच्या अभ्यासाकरता जमवलेल्या पत्रिका, ज्योतिषाची पूस्तक, अगदी लहानपणापासून बनवलेली पेंटींगस - त्यात कूत्री, मांजरी, मिकी माउस अशीच अधिक असणार, विविध मासिकांमधून आलेले सल्मान चे व्यवस्थित कापलेले फोटोज... काय काय गोष्टी सापडतील ह्याची उत्सुकताच आहे.

लेखिकेला सारखे जे अमेरिकन संस्क्रुतीचे धक्के बसत असतात तसे मला पण जाणवतात. अमेरिकेतील भारतीय मुलांची लग्न हा विषय लेखिकेने उत्क्रुष्ठरित्या हाताळला आहे. काही मुलांचे आई-वडिल मुली शॉर्ट लिस्ट करुन ठेवतात आणि मग मुलगा येउन प्रत्येक मुलीला एक एक वेळेस भेटतो आणि पसंती देतो. एकमेकांच खरच जुळणार आहे का हे एका भेटीत कळत नाही आणि त्यामुळे कधी मुलीची तर कधी मुलाची फसवणुक होते. सहसा लेखिका जसे विषय हाताळतात की प्रेम, नाती, दु:ख इत्यादी त्याहून शोभा चित्रे ने फार वेगळे व प्रगल्भ विषय मांडले आहेत. तिचा कॅंम्पिंग वरचा लेख वाचून तर मला कधी एकदा उन्हाळा सुरु होत आहे आणि कधी एकदा मी गाशा गुंडाळून कॅंम्पिंगला जाते अस झाल. निसर्गाच खुप लोभस वर्णन लेखिकेने केल आहे.

"कालचा सुर्यास्ताचा उत्सव रमणीयच होता. त्या तांबड्याभडक सूर्याची किरण लाटांवर, अगदी थेट किनारयापर्यंत पसरलेली. जणू तो सूर्य पाण्यात विरघळतोय आणि त्याचा रंग त्या पाण्याला लागतोय. विलक्षण अशा सोनेरी-तांबूस तेजान सगळ आसमंत झळाळून उठल होत. मावळता मावळता हा रंगांचा सोहळा आमच्या मनावर गोंदवणारा तो आदित्य आम्ही अनिमिष नेत्रांनी पाहत होतो."

मुलांना दत्तक घेण्याची आणि दत्तक गेलेल्या मुलांची सुध्दा बरयाचश्या केसेस मधे कशी कुचंबणा होत असते हे लेखिकेने एका लेखात छान नमुद केले आहे.

थोडक्यात हे पुस्तक जरूर वाचा.

अवकाश - सानिया

Author: Rasika Mahabal / Labels: , ,



पूस्तकं वाचतांना नवे विचार गवसतात, नवी वाक्ये सापडतात, जीवनाचा अर्थ नव्याने जाणवतो. मग अश्यावेळी इतर कोणाशीच संवाद साधण नकोस वाटत, आपला आपल्याशीच संवाद सुरु असताना बाहेरील व्यत्यय नकोसा होत असतो. ही अस्वस्थता कसली असते? कथेमधे कधीतरी कोठेतरी आपल्याला आपणच सापडत असल्याची भावना की अगदी याच अश्याच परिस्थितीत आपण कसे वागलो असतो याची उत्सुकता? काही लेखक, लेखिका आपल्याला असेच झपाटुन टाकत असतात.

इतक्यात सानिया नावाच्या लेखिकेच अवकाश हे पूस्तक वाचल.

सानियाच्या लिखाणाची पध्दत मला आवडली. पूस्तक वाचतांना सोडवले नाही पण पूस्तक वाचून झाल्यावर असे वाटले की ही गोष्ट 'माहेरची साडी' वगैरे साचा मध्ये येते. ज्यात नारी ही दुर्बल आणि अतिशय सहनशील असा समाजाचा घटक दाखवतात... आणि ती तशी असल्याबद्द्ल तिला थोर म्हणवलेली असते. 'बंदिनी स्त्री ही बंदिनी, ह्रुदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी!'...

जगातल्या कुठल्यातरी कोपरय़ात ते सत्य पण असेल ह्यात काही शंका नाही. पण सुरुवातीपासूनच जान्हवी धाडसी, महत्त्वाकांक्षी दाखवली आहे. ती अचानक आयुष्यातील दु:खांनी खचून जाते. जस की जान्हवी च्या भावाचा अकस्मात मृत्यू होतो आणि ह्या प्रसंगानंतर तिचे वडिल अंथरुण पकडतात आणि कोणाशी बोलत नाहीत, पण जान्हवी त्यांना बोलत करण्याचा किंवा माणसात आणण्याचा प्रयत्न पण करतांना दाखवलेली नाहीये.

ज़ान्हवीचे लग्न तिच्या मर्जीविरुध्द लावून देतांना सुध्दा ती पाहीजे तेवढा विरोध करत नाही. तिच्या मर्जीविरूध्द लग्न होत पण ह्यात तिच्या नवऱ्याचा काय दोश? त्याच आयुष्य का ती बरबाद करते. त्याच्यासुध्दा काही आशा, आकांक्षा असतील त्या लेखिकेने सोयिस्कररित्या दुर्लक्षीत करून जान्हवीला महान करार दिला आहे.

मनाविरुध्द गोष्टी घडत असतांना त्याच्यावर काही कृती करायची नाही आणी मग माझ नशिबच फूटक अस म्हणून रडत बसायच ह्याला काय अर्थ आहे. तिच्या आयुष्यातले प्रश्न एवढे मोठे नसतात की त्यांना ती सामोरी जाऊ शकली नसती पण उगीचच एकाच व्यक्तीच्या वाट्याला कशी जगातली सर्व दु:ख येतात आणि मग ती व्यक्ती बिच्चारी कशी खचून जाते अस वगैरे दाखवून उगीचच सहानुभुती मिळवण्याचा नाहक प्रयत्न केला आहे.

त्या प्रयत्नांना लेखिकेला सुरुवातीला यश पण मिळाल आहे, म्हणजे अगदी मला गळे काढून रडवण्यापर्यंत यश आल आहे :) पण काही वेळाने जान्हवीच so called bold and beautiful character माझ्या डोक्यात जाऊ लागल. अर्थात हे माझे विचार आहेत. मी जान्हवीशी relate करू शकले नाही, आम्ही दोघी अगदी विरुध्द व्यक्तिमत्वाच्या असल्याने असेल कदाचित. अर्थात ही कथा कुठल्या काळाची दाखवली आहे त्याला सुध्दा महत्त्व आहे. तो काळ बंड पूकरण्याचा नसेल कदाचित.

मला काही गोष्टी खटकल्या ह्याचा अर्थ तुम्हाला सुध्दा खटकतील असा होत नाही.

हे पूस्तक का वाचा?

त्यातील भाषेसाठी, लिखाणाच्या शैलीकरता. पूस्तक एकदम छोट आहे, त्यातील कथा खूप जलद गतीने पुढे जाते, प्रत्येक क्षणाला पुढे काय घडणार ही उत्सुकता कायम ठेवते, जीवनात येणारे काही प्रसंग, नाती लेखिकेने चांगली टिपली आहेत.