वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षापासून डोक्यातली चक्र सुरु होतात (आणि तशीच आपल्या पालकांची पण आपल्या बद्दल सुरु होतात). मला काय बनायच आहे...
एवढ्या लहान वयात कदाचित पहिल प्रोफेशन जे आपण बघतो ते असत ’टीचर’च. मला मग मास्तरीणबाई व्हायच होत. शेजारपाजारच्या छोट्या पोरांची मी शाळा भरवू लागले. मास्तरकी पेश्यातल्या सतत बोलण्याचा मला कंटाळा येऊ लागला.(मला कधीतरी परत गणिताचा क्लास सुरु करायची ईच्छा आहे)
आणि मी विचार करु लागले, मला काय बनायच आहे...
सहा सात वर्षांची असतांना आईने संगीत शाळेत नाव नोंदवले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्यावर जसजस अवघड व जास्त रियाज सुरु झाला तस तस टॉन्सिल्सचा त्रास वाढत गेला. टॉन्सिल शरिरात महत्त्वाच्या कार्याकरता असतात ते ऑपरेशन करुन काढायचे नाहीत ही वडिलांची आद्न्या. समोर एकच पर्याय - गाण बंद. गायिका बनण्याच स्वप्न तिकडेच कोलमडून पडल, (आता मी बाथरुम सिंगर आहे) पुन्हा चक्र सुरु, मला काय बनायच आहे...
दुरदर्शनवर बातम्या बघून मी ठरवल मला बातमीदार व्हायचय. पुस्तकातले धडे ऩ धडे आरशात बघून बातम्या स्टाइल वाचून काढायला लागले. पुढे कोणीतरी सांगितल बातमीदार होण्याकरता वेगळा कोर्स करावा लागतो मुंबईत राहून. स्वतःच स्वप्न बदललेल चालेल पण मुंबई नको. (आता मी बातम्या तर बघते पण बातमीदारांना इमिटेट करण बंद केल) पुन्हा विचार सुरु, मला काय बनायच आहे...
शाळेत बायलॉजी मधे चांगले मार्कस पडायचेत, पण कोणाला माहीत होत की डॉक्टर बनण्याकरता डिसेक्शन पण कराव लागत. कॉलेजच्या लॅबमधे डिसेक्शन करतांना उलटी केली आणि ठरवल हे काही खर नाही. (अजुनही बायलॉजीची बरीच पुस्तक वाचते) पुन्हा मी विचार करु लागते आता काय बनु शकते?
रंगांबरोबर खेळायला मला खुप आवडायच. सर्व्या प्रकारचे पेंटिंग प्रकार शिकल्यावर ठरवल पेंटर व्हायच. पण मी तास ऩ तास बसून केलेले पेंटिंग विकायचे म्हणजे दुःखद वाटल.शेवटी पेंटिंग छंद म्हणून ठीक आहे पण पेशा नको असे ठरवले. (घराच्या सर्व भिंती मी माझ्या पेंटिंग्सने भरवल्या आहेत) पण परत तोच प्रश्ण : आता काय मी बनु?
वाचनाची नेहमीच खुप जास्त आवड होती. पुस्तक येता जाता खाऊन टाकायचे मग ठरवल स्वतःच काहीतरी लिहूयात - लेखक बनुयात. थोड्या फार कविता व लेख लिहिण्यापलिकडे माझी गाडी गेलीच नाही. (आजही मी माझ्या ब्लॉग/डायरीवर लिहित असते) आता काय बर बनू मी...
कॉलेजमधे शिंग फुटल्यावर पार्लरमधे जाऊ लागले आणि शुल्लक गोष्टिंकरता भरपुर पैसे मिळवणाऱ्या बायका बघून ठरवल ब्युटिशियन व्हायच. ताबडतोब कोर्स जॉइन करुन संपवला पण मातोश्रींनी माझ्या प्लॅनला विरोध केला मग तो प्लॅन तिकडेच बारगळला. (आजही स्वतःच्या चेहऱ्यावर प्रयोग करते) पुन्हा तेच, आता काय बनु?
मनिष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे बघून वाटल मला पण रंगांच द्न्यान आहे, चला तर मग फॅशन डिझायनर बनुयात. तातडीने पार्ट टाईम फॅशन डिझाईन इंस्टिट्युट जॉइन केली. पहिला कोर्स - शिवणकाम! दिवसभर शिवण करुन पाठकाड तर मोडलच पण भाऊ ’शिंपी होणार शिंपी होणार’ म्हणून चिडवू लागला. त्यामुळे कोर्स पुर्ण करुन पण तो प्लॅन पत्त्याच्या बंगल्यासारखा तिकडेच ढासळला. (मी अजुनही माझे ड्रेसेस स्वतःच डिझाईन करते आणि अधुन मधुन शिवते)
मला काय बनायचय चिंतन परत सुरु...
वडिल सुंदर पत्रिका बघतात. त्यांच बघुन उत्सुकता म्हणुन ज्योतिष क्लास लावला. त्याचा भरपुर अभ्यास केला, काही अंशी विश्वास पण बसला पण एक पत्रिका बघायचे असे किती मिळणार? (अजुनही मी विरंगुळ्याकरता पत्रिका बघते)
पुन्हा तोच प्रश्ण, मी आयुष्यात काय बनु?
मल्लेश्वरी - ऑलंपिक्स मधे वेट लिफ्टर म्हणून पदक पटकावलेली पहिली महिला. झाल तर मग, मला दुसरी बनायच होत. ताबडतोब जिममधल्या इंस्ट्रक्टरला प्लॅन सांगुन ट्रेनिंग सुरु. डॉक्टर वहिनीने महिलांच्या शरिरास हे योग्य नाही अस ऑब्जेक्शन घेतल. (मी रोज जिमला जाते, अधुन मधुन वेट लिफ्टींग पण करते) पुन्हा मी उत्तराच्या शोधात...
कॉलेजच्या क्रिकेट टीमची कॅप्टन होते म्हणुन क्रीकेटर बनणार होते, मग चेस प्लेअर बनायच होत(अजुनही याहु गेम्सवर मी सारख्या मॅचेस हरत असते). स्टेजवर गेल्यावर घाबरुन पहिलीच स्टेप विसरले आणि डान्सर बनायच स्वप्न पण तिकडेच विसरले. (माझा कथ्थक क्लास अमेरिकेत चालु आहे).
चांगल्या दिसण्याच्या कॉंम्प्लीमेंटस मिळाल्या म्हणून थोडे मॉडेलिंग केले, वामन हरी पेठे वगैरे तत्सम जाहीराती. पुढे पुढे जाणवले ह्या फिल्डमधे नाग कमवायला काही प्रिंसिपलस गिरवी ठेवण गरजेच आहे. कॉम्प्रमाईझ केले नाहीत आयुष्यात. प्रिंसिपल्स ना अति जास्त चिकटलेल्या होसर्ड रोअर्कचा राग येऊन फाऊंटनहेड पुस्तक एका क्षणी फेकून देणारी मी अचानक त्याच्या प्रेमात पडले. त्याच्या मानसिकतेची जाणीव झाली आणि ती पटलीसुध्दा.
आता तुम्ही विचार करत असाल की शेवटी मी करते काय? (इतर अक्टिव्हीटीज मधुन वेळ काढुन) कंप्युटरसमधे मास्टरस केल आणि पुण्यातली एक मोठी कंपनी हायर करत होती, इंटरव्ह्यु करता १०० लोक, त्यापैकी तिघांना नोकरी मिळली. त्यात मी पण एक होते. एवढी कॉंपिटिशन असुन मला जॉब मिळाला ह्याचा अर्थे कदाचित मी हेच करण विधिलिखित होत. आज ५ पैकी ३ लोक आयटी मधे असतात त्यामुळे मी काहीही हटके किंवा वेगळ करण्याच स्वप्न पुर्ण नाही झाल.
कधी कधी वाटत एकाच गोष्टीत प्राविण्य मिळवण्यात सर्व प्रयत्न लावले असते तर बर झाल असत. पण मग वाटत एका छोट्या आयुष्यात थोड्या फार गोष्टींचा अनुभव तरी घेता आला!