प्रवास भितिचा

Author: Rasika Mahabal / Labels: , , , ,



माझा जन्म एका साधारण ५०० ची लोकसंख्या असलेल्या खेड्यात झाला. ३ वर्षांची होईपर्यंत प्राणीओळख मला फक्त एकाच प्राण्याची होती. तो मला सर्व प्राण्यांचा राजा वाटायचा. त्याची संख्या लोकांहुन अधिक होती. प्राण्याच नाव होत डुक्कर. त्याच्या दिनचर्येशी मी पुर्णपणे परिचीत झाले. त्याच्या जीवनप्रणाली मधे माझी पीएचडी होण्याआधीच माझ्या वडिलांची दुसऱ्या छोट्या गावात बदली झाली.

नव्या गावाच्या नव्या घरात एका स्टूलवर उभ राहुन मी वडिल आरशात बघुन फावड्यासारख यंत्र का फिरवत आहेत ह्याच निरिक्षण करत असतांना आमची आई जोरात ओरडत त्या खोलीत आली "सापपपप" आणि तिच्यामागे एक काळाबिद्रा चिकट प्राणी जमिनीवर वेडावाकडा सरपटत आला. पहिल्याच नजरेत मी त्याचा तिरस्कार करु लागले. पण साप जमात माझ्या प्रेमात पडली आणि त्यापुढे मी जिथे जिथे राहिले तिथे तिथे त्यांनी माझा पिछ्छा पुरवला.

आमच हे नात बरीच वर्ष टिकल. ह्या आधुनिक जगात स्वफायदाखेरीज नाती टिकुन राहणे म्हणजे आश्चर्यकारकच म्हणायचे. त्यामानाने तो माझ्याशी खुपच प्रामाणिक राहिला.

नागपंचमीच्या दिवशी मी एका मैत्रिणीकडे गारुडीच्या करामती बघायला गेले होते, साप कसा दुध पितो वगैरे. गारुडीच्या टोपलीतुन तो साप निसटला आणि जमलेल्या गर्दीत एकच हलकल्लोळ झाला. मी माझ्या चपला न घालता पळ काढला. रस्त्यावर जरा दूर पोचल्यावर मी मागे वळून बघितले तर गारुडी त्या सापाला टोपलीत कोंबत होता. आणि मला साक्षात्कार झाला की सापांना माणसांएवढ जोरात पळता येत नाही. बर झाल तो साप नगिना वगैरे सिनेमांमधील जोरात पाठलाग करण्याच ट्रेनिंग मिळालेला साप नव्हता. नाहितर माझी काही खैर नव्हती.

आता मी अमेरिकेतल्या एका मोठ्या बिल्डींगमधे राहते. कधी कधी मला वाटत इव्होल्युशनच्या प्रोसेस मधे सापांनी बिल्डींग वर सरपटायला शिकल तर? आता सापांची भिती मला फक्त स्वप्नातच वाटते. खऱ्या आयुष्यात माझ्या ह्रुदयात सापांची जागा इतर कोणीतरी घेतली आहे.

ह्या नविन व्यक्तीशी माझी पहिली भेट मी सेकंड इयरला असतांना झाली. पहिल्याच भेटीत ह्या व्यक्तीच्या हातात ड्रिलींग मशिन होती. ही व्यक्ती होती डेंटिस्ट!

आयुष्यात आलेल्या सर्व सापांहुन अधिक ह्या व्यक्तीने मला घाबरवले. माझ्या दुसऱ्या भेटीत ह्या डेंटिस्टकडे काही डेंटिस्ट्रीचे स्मार्टे विद्यार्थी येऊन लोकांचे दात अभ्यासत होते. मी आत जाताच नव भक्ष मिळाल्याच्या क्रुर आनंदात ह्या शिकाऱ्यांनी माझे दात बघण सुरु केल. अहो क्रिष्णाने आ वासला तेव्हा अर्जुनाला सबंध ब्रम्हांड दिसल. पण आ वासून कोणाला आपले किडके दात दाखवण ही काय रुबाबाची गोष्ट नव्हे. आणि खास करुन बघणारे डोळे स्मार्ट व कदाचित कॉलेजमधल्या होतकरु विद्यार्थांचे असतील. माझे किडके दात बघून त्यांची दातखिळी बसली असणार आणि असले नसलेले सर्व चान्स मी घालवून बसले होते. पुढे मग मी माझ्या मावज बहिणीकडे जाऊ लागले कारण अजुन कोणाला माझ्या किडक्या दातांची कथा कळाल्यास मला ’स्थळ’ येणार नाही ही आमच्या मातोश्रींची भिती.

साप आणि डेन्टीस्ट ह्यांची स्वप्नातसुध्दा भेट घ्यावी लागणार नाही अस आयुष्य मला दे अशी मी रोज प्रार्थना करते!

2 comments:

अपर्णा said...

मला वाटायचं की इथे अमेरिकेत निदान सबअर्बन भागात साप नसतील. पण अगं इथे एकदा आमच्या घराबाहेर एक छोटा फ़ॉउंटन आहे त्याच्यात पडला होता अगदी छोटा..आमचा शेजारी म्हणाला अगं काही नाही हा गार्डन स्नेक आहे आणि त्याने चक्क हाताने उचलुन तो एका झुडुपात टाकला...मेरी तो ** गय़ी थी....
छान आहे पोस्ट..

Ajay Sonawane said...

"पण आ वासून कोणाला आपले किडके दात दाखवण ही काय रुबाबाची गोष्ट नव्हे." या वाक्याने मला खुप हसवलं. माझही असंच होतं, डेंटिस्ट कडे गेल्यावर