रहस्य गुंत्याच

Author: Rasika Mahabal / Labels: , , ,

गुंता निर्माण करण्यात काहीजणांचा मोठाच हातखंडा असतो. साध-सरळ काही चाललय, आत हे क्षण मजेत घालवू, जगण्याचा जरा वेगळाही विचार करु, थोडी वेगळी पायवाट चालु, असा विचार करण्याचा विसाव्याचा क्षण येताच काही माणसांना अस्वस्थता येते. मग ते ध्यानीममी नसलेले पंचवीस वर्षांपूर्वीचे विषय उकरुन काढतील, जुने अपमान उपसून काढतील, काहीतरी कडवट शब्दांची नांगी मारतील... आणि छान सरळ संबंधांचा गुंता करतील. असा गुंता झाला की यांचे ८-१० दिवस मोठे मजेत जातात, मजेत याचा अर्थ त्या तडफडीचा, भांडणाचाही ही मंडळी एक हलक्या दर्जाचा आनंद घेतात.

गुंत्यान सारया घरातील प्रवाहीपणाच मुळाता साकळतो. इतर वेगळे विषय अशा घरात निघूच शकत नाहीत. घरातल्या पाच माणसांपैकी चार माणस एकमेकांशी न बोलणारी, किंवा नीट न बोलणारी असली की मग ते घर कसल? खर तर घरात काही मूलभुत समस्या आहेत का? पैशाची अडचण? नाही. जागेची, पाण्याची? कसली कमतरता नाही. जगात किती वेगवेगळे विषय आहेत! व़्रुत्तपत्रातल्या वेगळ्या घटनांपासून ते नवी पुस्तक, नवा चित्रपट, नाटक, एकमेकांच्या ऑफिसमधल्या धमाल गमती, मुलांच्या शाळेतील स्पर्धा... एक ना दोन हजार विषय गप्पांमधे रंग भरु शकतात. अशा निर्मळ गप्पांमधून घर एक पाऊच पुढं सरकत. प्रगतीच्या दिशेने.

पण काही घर पुढे न सरकणारीच घर असतात. अकारण वितंडवाद, पण निष्पन्न शुन्य. मान-अपमान हेच या घराचे खांब असतात, अन विसंवादातील अबोला हे या घरांच छप्पर! स्वतःच ओढवून घेतलेल्या कटकटीत काही घरांच, त्यातल्या उमेदीच्या, उमलत्या व्यक्तीमत्त्वांच जगणं पार मातीमोल होऊन जात.


कोण जिंकणार?
कोण हारणार?
आयुष्य मात्र निघुन जाणार!

घरातल्या एखाद्या हेकट, मुजोर, अहंकारी माणसामुळे सारं घरच गुंत्यात सापडत. प्रश्ण अस्तित्त्वाचा असल्याने बाकीचे घटक फक्त सोसत राहतात. घुसमटत राहतात. चार घास कमी परवडले, पण घरात शांती हवी. विरामाचे स्वस्थ क्षण हवेत... ज्या क्षणी घरातले सर्व घटक आपापल्या भविष्याचा वेध होऊ शकतील, क्षमता आजमावतील, उड्डाण करण्याची जिद्द कमावतील.

आता जिवितासाठी, वेगळा उद्योग नसलेली, पुर्वपूण्याईवर चार पैसे घरबसल्या मिळवणारी रिकामटेकडी माणसही असे गुंते करण्यात अग्रेसर असतात. कधी फुकटचे सल्ले दे, कुठे उगिच उणिवा काढ, तर कधी निंदेची खिरापत इथून तिथे झोपाळलेल्या दुपारी वाटत फिर. काळजीच्या अडाणी ध्यासाने ही माणस नवी काळजीच निर्माण करतात. समोरच्या माणसाची इच्छा नसतांना आपण दिलेला सल्ला बुमरॅंगसारखा आपलाच अपमान होऊन उलटतो. त्यातून निर्माण होतो नवा गुंता.
नवी पिढी काही धडे ठेचा खाऊनच शिकणार आहे. सारख नव्या पिढिच बुलेटप्रुफ जॅकेट होऊन बसण्यापेक्षा काही समस्या नव्या पिढिला झेलू द्याव्यात. समजुतदारी, संवादी घटक असतील तर अनाग्रही व़्रुत्तीने एकदा फार तर सांगाव; पण आपल्या सांगण्याचा काच होऊ नये.

सारख्या कोर्टकचे़ऱ्या, भाऊबंदकी, वादविवाद, मान अपमान, माझ खर की तुझ खर, या व्रुत्तीने जीवनातले मुळ प्रश्ण बाजुलाच पडतात. आणि अमुल्य आयुष्य अक्षरशः गंजुन जात. काय साधत यान?

अंगणातल उमललेच मोगऱ्याच फुल ओंजळीत घेऊन हुंगल्याविणाच त्याच निर्माल्य होत... आणि आपण फुलल्या-विणाच ओघळून जातो!

पाळणाघरापासून रिटाअरमेंट पर्यंत सर्व विषयांवर अतिशय सुरेख शब्दात सावर रे ह्या प्रविण दवणांच्या पुस्तकांत लेख आहेत. मधे काहि खर काहि खोट आणि अशीच काहि कंटाळवाणी पुस्तक वाचल्यावर मराठी पुस्तक वाचण्याचा उत्साह संपला होता. पण ह्या सावर रे चे सारे भाग वाचुन मी पुन्हा एकदा मराठी पुस्तकांच्या आणि मराठी भाषेच्या प्रेमात पडले आहे... वरील लेख सावर रे - भाग २ मधुन.

0 comments: